गुढीपाडव्यानिमित्त मंगळवारी शहरात ठिकठिकाणी शोभायात्रांचे आयोजन करण्यात आले होते. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी सांस्कृतिक कार्यक्रम, ढोल-ताशा पथकांची प्रात्यक्षिके, महिलांच्या बाइक रॅली, सामाजिक आध्यात्मिक चित्ररथ साकारण्यात आले होते. सर्वच शोभायात्रांमध्ये हिंदू संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. बेलापूर, सीवूड्स, नेरूळ, जुईनगर, सानपाडा, वाशी, ऐरोली, कोपरखैरणे, घणसोली या सर्वच विभागांमध्ये शोभायात्रांचे आयोजन करण्यात आले. सीबीडी- बेलापूर येथे आयोजित शोभायात्रेत महिलावर्ग मोठ्या संख्येने सहभागी झाला होता. या वेळी शोभायात्रेच्या माध्यमातून जल हैं तो, कल हैं हा मोलाचा संदेश नागरिकांमध्ये पोहोचविण्यात आला. गुढीपाडव्यानिमित्त रांगोळी स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. सीबीडी सेक्टर ८ कालिमाता मंदिर येथून निघालेल्या या शोभायात्रेचा शेवट सेक्टर २ येथील अलबेला हनुमान मंदिर येथे झाला. या शोभायात्रेला आमदार मंदा म्हात्रे, नगरसेविका सुरेखा नरबागे उपस्थित होत्या. नवी मुंबई प्रेस क्लबच्या वतीने वाशीतील मरीआई गावदेवी मंदिर ते शिवाजी चौकपर्यंत नववर्ष स्वागत यात्रेचे आयोजन करण्यात आले. या वेळी गुढीपूजन, सांस्कृतिक कार्यक्रम तसेच ढोल-ताशा वादनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. सीवूड्स उत्सव समितीच्या वतीने सेक्टर ५० येथे शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते. यंदाचे हे दुसरे वर्ष असून मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. नेरुळमधील संकल्प शोभायात्रा प्रतिष्ठानच्या वतीने डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालय ते सेक्टर १५ येथील दत्त मंदिरापर्यंत शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते. चित्ररथाने वेधले उरणकरांचे लक्ष उरणमध्ये गुढीपाडवा सणाचे औचित्य साधून आणि मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते. चित्ररथातून काढण्यात आलेल्या शोभायात्रेच्या मिरवणुकीत आमदार मनोहर भोईर, सायली म्हात्रे, सेनेचे राजिप सदस्य विजय भोईर, उनप सेनेचे गटनेते गणेश शिंदे, नगरसेवक, नगरसेविका, समाजसेवक संतोष पवार, काशिनाथ गायकवाड, पालू भिंडे तसेच ज्येष्ठ नागरिक मंडळाचे पदाधिकारी, सदस्य, विविध सामाजिक संस्थांचे पदाधिकारी, शालेय विद्यार्थी आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. पेन्शनर पार्कवरून निघालेल्या चित्ररथ व मिरवणूक उरण शहरातून फिरविल्यानंतर उनप प्राथमिक शाळेच्या प्रांगणात सांगता करण्यात आली. नेरुळमधील भीमाशंकर सोसायटी येथे शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी नगरसेवक रवींद्र इथापे यांच्या उपस्थितीत क्षत्रिय ढोल पथकाचा शुभारंभ करण्यात आला. श्री सिद्धिविनायक विश्वस्त मंडळ ऐरोली सेक्टर ५ यांच्या वतीने ऐरोली सिद्धिविनायक मंदिर ते ऐरोली सेक्टर १६, १७, ४ व सेक्टर ५ अशी शोभायात्रा आयोजित केली होती. यामध्ये महिला वर्गानी पारंपरिक वेशभूषा परिधान करून शिवकालीन दांडपट्टा, लेझीम, लाठी- काठी, तलवारबाजी असे साहसी खेळ प्रत्येक चौकात सादर केले, तसेच बाइकवर स्वार होऊन रॅलीत सहभाग घेतला.खारघरचा राजा गणेश चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने केंद्रीय विहार ते गणेश मंदिर परिसरात शोभायात्रेचे आयोजन केले होते. उत्सव ढोल ताशा पथकाच्या वतीने प्रात्यक्षिक सादर करण्यात आले. महिलांनी मोठ्या संख्येने शोभायात्रेत सहभाग घेतला.अखिल सानपाडा सांस्कृतिक प्रतिष्ठानच्यावतीने सानपाडा परिसरात भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये १०४ उपग्रहांचे चित्ररथ हे विशेष आकर्षण ठरले. या रॅलीमध्ये शिवराय, मावळे, पारंपरिक वेशभूषा, शस्त्र, लेझीम पथकाचे प्रात्यक्षिक, पारंपरिक वाद्य कौशल्य पाहण्याची संधी मिळाली. अखिल सानपाडा सांस्कृतिक प्रतिष्ठान अध्यक्ष कैलास ताजणे, कार्याध्यक्ष बाळासाहेब महाले, घनश्याम पाटे, श्रीकांत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली शोभायात्रेचे आयोजन केले होते.रामरथ, लेझीम, ध्वजपथक अन् लाठीकाठी पनवेल : तालुक्यातील खारघर, कामोठे, कळंबोली, पळस्पे तसेच पनवेल शहरातून मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी भव्य शोभायात्रेचे आयोजन केले जाते. यंदाचे हे शोभायात्रेचे एकोणिसावे वर्ष होते. शहरातील सारस्वत बँक (पायोनिअर सोसायटी) समोरील मैदानातून सकाळी ७ वाजता सुरु झालेली ही शोभायात्रा प्रताप नगर, कफ नगर, रॉयल कॉस्मो, गोखले सभागृह, बापट वाडा, टिळक रोड मार्गे शेवटी सावरकर चौक येथे विसर्जित झाली. पनवेल शहरातून १९९८ पासून भव्य शोभायात्रा काढण्यात येते. शोभायात्रेत मोठ्या प्रमाणात नागरिक सहभागी झाले होते. शोभायात्रेत रामरथ, अश्व, लेझीम पथक, विविध चित्ररथ, ध्वज पथक, लाठीकाठी पथक, सायकल पथक, ढोल पथक, शुभंकरोती पथक, युवानाद लेझीम पथक, एकवीरा बॅण्ड पथक, लक्ष्मी चॅरिटेबल ट्रस्ट चित्ररथ, इनरव्हील चित्ररथ, मस्ती की पाठशाला चित्ररथ, आचार्य अत्रे कट्टा तसेच अनेक संस्थांचे पदाधिकारी व सदस्यांचा आणि नागरिकांचा सहभाग मोठ्या प्रमाणात होता. पर्यावरण संवर्धनाचा संदेशनेरुळमध्ये विशेष संकल्प शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये विद्यार्थी तसेच तरुण मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. पर्यावरणाचे रक्षण करा, झाडे लावा... झाडे जगवा, स्वच्छ नवी मुंबई, जलबचत, लेक वाचवा आदी संदेश शोभायात्रेच्या माध्यमातून देण्यात आला.खरेदीला जोरशहरातील दुकानांमध्ये विविध आॅफर्सने ग्राहकांना आकर्षित करण्यात आले. दुचाकी वाहने, चारचाकी तसेच गृहखरेदीला वाव मिळाल्याने या क्षेत्रात कोट्यवधींची आर्थिक उलाढाल झाल्याची माहिती व्यापारीवर्गाने दिली. इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीचेही प्रमाण वाढले असून, गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर अनेकांनी मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदी केल्या. सोने खरेदीला उधाणसाडेतीन मुहूर्तांपैकी हा पूर्ण मुहूर्त साधत शहरवासीयांनी सोने खरेदी केली. सराफ बाजारपेठा गजबजल्या असून सोन्याचे दर स्थिरावल्याने व्यापाऱ्यांचा धंदा तेजीत झाला. महिलांनी आभूषणे खरेदी करत नवीन वर्षाचे स्वागत केले. शहरातील सराफ बाजारपेठांमध्ये विविध आॅफर्स, बक्षिसांची लयलूट, खरेदीवर सूट यामुळे ग्राहकांना आकर्षित करण्यात आले.पनवेलमध्ये इच्छुक उमेदवारांचा शोभायात्रेत सहभागदरवर्षी पनवेलमध्ये मराठी नववर्ष स्वागताला शोभायात्रा काढण्यात येते. मात्र या वर्षी पनवेल महापालिकेची निवडणूक असल्याने काही इच्छुक उमेदवार पहिल्यांदाच या वर्षी शोभायात्रेत सहभागी झालेले दिसत होते. त्यामुळे अनेकांचे लक्ष त्यांनी वेधून घेतले होते.
मराठमोळ्या शोभायात्रा
By admin | Published: March 29, 2017 6:03 AM