मॅरेथॉन बाजारीकरणावर आता राहणार अंकुश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2019 11:19 PM2019-06-17T23:19:06+5:302019-06-17T23:19:20+5:30
संस्थांचा व्यावसायिक हेतू; नियमावली तयार करण्याचा नवी मुंबई महापालिकेचा निर्णय
नवी मुंबई : शहरात मॅरेथॉन स्पर्धांचे पेव फुटले आहे. अनेक संस्था व्यावसायिक हेतूने स्पर्धांचे आयोजन करत असून खेळाचे बाजारीकरण सुरू झाले आहे. चुकीच्या गोष्टींना आळा घालण्यासाठी नियमावली तयार करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. पूर्ण मॅरेथॉनसाठी २ लाख, अर्धमॅरेथॉनसाठी १ लाख रुपये शुल्क आकारण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. स्पर्धा आयोजित करण्यापूर्वी महापालिकेची परवानगी घेणेही बंधनकारक असणार आहे.
नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये काही वर्षांपासून मॅरेथॉन स्पर्धा, वॉकेथॉन व सायकल स्पर्धांचे प्रमाण वाढले आहे. महापालिकेने केलेल्या पाहणीप्रमाणे आॅक्टोबर ते मार्च दरम्यान प्रत्येक रविवारी कुठे ना कुठे मॅरेथॉन स्पर्धा घेतली जात आहे. ५० टक्केपेक्षा जास्त स्पर्धा पामबीच रोडवर होत आहेत. ज्या रोडवर मॅरेथॉन स्पर्धा घेतली जाते त्या रोडवरील वाहतूक काही तास बंद करावी लागत आहे.
स्पर्धा संपेपर्यंत वाहतूक विस्कळीत होऊन नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत असते. अनेक स्पर्धांच्या आयोजनामागील उद्देश शंकास्पद असतो. सामाजिक संदेश देण्याच्या व खेळाडूंना प्रोत्साहित करण्याचा हेतू असल्याचे सांगितले जात असले तरी प्रत्यक्षात स्पर्धेच्या आयोजनामधून मोठी आर्थिक उलाढाल होऊ लागली आहे. प्रायोजकांकडून मोठ्या प्रमाणात पैसे वसूल केले जातात. स्पर्धेसाठी शहरात अनेक ठिकाणी विनापरवाना होर्डिंगबाजी केली जाते. महापालिकेच्या क्रीडा विभागाची व आवश्यक त्या परवानग्याही घेतल्या जात नाहीत. स्पर्धेची सुरवात ज्या ठिकाणी होते त्या ठिकाणी खड्डे खोदून व्यासपीठ तयार केले जाते. मोठ्या प्रमाणात शहर विद्रूप केल्याच्या घटना घडू लागल्या आहेत.
मॅरेथॉन स्पर्धा झाल्यानंतर रोडवर मोठ्या प्रमाणात प्लॅस्टिकच्या बाटल्या टाकल्या जात आहेत. कचऱ्याचे ढीग तयार होतात. आयोजक कचरा उचलण्याकडेही दुर्लक्ष करत आहेत. आयोजक महापालिकेच्या सुविधा वापरत आहेत, परंतु त्याचा काहीही लाभ महापालिकेस होत नाही. उलट आयोजकांनी नियमांचे पालन न केल्यामुळे त्यांनी केलेला कचरा पालिकेच्या कर्मचाऱ्यांना उचलावा लागतो. याशिवाय सकाळी चार ते पाच तास पामबीचसारखा महत्त्वाचा रोड अडविला जात आहे. वाहनधारकांना व प्रवाशांना गैरसोयींना सामोरे जावे लागत आहे.
मॅरेथॉन स्पर्धांचे बाजारीकरण थांबविण्याची मागणी दक्ष नागरिकांकडूनही होऊ लागली होती. महापालिका प्रशासनाने याची गंभीर दखल घेतली असून स्पर्धांच्या आयोजनासाठी नियमावली तयारी केली आहे. २० जूनला होणाºया सर्वसाधारण सभेमध्ये ही नियमावली मंजुरीसाठी ठेवण्यात येणार आहे.
आयोजनासाठी प्रस्तावित नियमावली
स्पर्धांच्या आयोजनासाठी महापालिकेच्या क्रीडा विभागाची परवानगी घेणे बंधनकारक आहे.
विनापरवाना स्पर्धांचे आयोजन केल्यास संबंधित संस्थांवर कायदेशीर कारवाई केली जाणार.
स्पर्धेचे आयोजन करताना कोठेही खड्डे खणता येणार नाहीत. विनापरवाना कोणत्याही प्रकारची जाहिरात करता येणार नाही.
परवानगी घेऊन लावलेल्या जाहिराती व माहितीफलक तत्काळ काढून टाकण्याची जबाबदारी आयोजकांची राहील.
पोलीस व इतर शासकीय कार्यालयांची परवानगी घेण्याची जबाबदारी आयोजकांची राहील.
रोड व मोकळ्या जागेवर मंडप, स्टेज टाकायचे असल्यास त्यासाठी संबंधित विभाग अधिकाºयांची परवानगी घेणे बंधनकारक राहील.
स्पर्धेच्या ठिकाणी व मार्गावर पडलेली पाण्याची बाटली, कप, प्लॅस्टिक किंवा इतर कचरा उचलण्याची जबाबदारी आयोजकांची राहील.
स्पर्धा संपल्यानंतर मार्गावर अस्वच्छता दिसल्यास संबंधितांची अनामत रक्कम जप्त करण्यात येणार.