अभ्यासक्रमात मराठवाडा मुक्ती संग्रामाचा समावेश व्हावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2017 03:18 AM2017-09-18T03:18:00+5:302017-09-18T03:18:03+5:30
ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून १९४७ रोजी भारत स्वतंत्र झाला. मात्र भारताचा अविभाज्य घटक असलेले हैदराबाद संस्थान त्या वेळी भारतात समाविष्ट झाले नव्हते. त्यामुळे स्थानिक नागरिकांना निजामांच्या अत्याचाराला सामोरे जावे लागत होते.
पनवेल : ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून १९४७ रोजी भारत स्वतंत्र झाला. मात्र भारताचा अविभाज्य घटक असलेले हैदराबाद संस्थान त्या वेळी भारतात समाविष्ट झाले नव्हते. त्यामुळे स्थानिक नागरिकांना निजामांच्या अत्याचाराला सामोरे जावे लागत होते. या अत्याचारा विरोधातच ठिणगी उठल्यानंतर हैदराबाद मुक्तीचा लढा उभा राहिला. त्यानंतर १७ सप्टेंबर १९४८ रोजी हा लढा यशस्वी होऊन हैदराबाद संस्थानचा भारतात समावेश करण्यात आला. मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त रविवारी खारघरमध्ये सत्याग्रह विद्यालयात विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. माजी सनदी अधिकारी आर. के. गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली हा दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
कार्यक्र मात मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या आठवणी, इतिहासाची माहिती देत तत्कालीन निजाम शासनाच्या अमानवीय अत्याचारातून कशाप्रकारे मराठवाडा, विदर्भातील नागरिकांची सुटका झाल्याची माहिती डॉ. जी. के. डोंगरगावकर यांनी दिली.
मराठवाडा मुक्ती संग्रामचा लढा यशस्वी झाला नसता तर माझ्यासारखा सनदी अधिकारी निर्माण झाला नसता अशी कबुली कार्यक्र माचे अध्यक्ष माजी सनदी अधिकारी आर. के. गायकवाड यांनी दिली. लढ्यानंतर मोठी क्रांती झाली. सद्यस्थितीत मराठवाड्यातील तरुण जगभरातील अनेक देशांत शिक्षण, नोकरीनिमित्त वास्तव्यास असल्याचे गायकवाड यांनी सांगितले.
महाराष्ट्रातील अभ्यासक्रमात मराठवाडा मुक्ती संग्रामाचा समावेश करणे गरजेचे आहे. सध्याच्या पिढीला या मुक्ती संग्रामाची माहिती असणे गरजेचे आहे. याकरिता राज्य सरकारबरोबर पत्रव्यवहार करणार असून, महाराष्ट्रातील सर्व शाळांमध्ये मराठवाडा मुक्ती संग्रामचे कार्यक्र म झाले पाहिजे, असेही डोंगरगावकर यांनी सांगितले.
साहित्यिक संशोधक डॉ. किरणकुमार कवठेकर यांनीही मराठवाडा मुक्ती संग्रामावेळी अत्याचाराची माहिती उपस्थितांना दिली.
या वेळी प्रावीण्य मिळवलेल्या प्रज्ञावंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. उपस्थितांमध्ये जोत्स्ना साबळे, सुजाता भोसले, वनिता सूर्यवंशी यांच्यासह विद्यार्थ्यांचा देखील समावेश होता.
पनवेलमध्ये मराठवाडा मुक्ती संग्राम दिन साजरा
कळंबोली : मराठवाडा मित्र परिवार, नवी मुंबई यांच्या वतीने रविवारी मराठवाडा मुक्ती संग्राम दिन साजरा करण्यात आला. या वेळी विविध कार्यक्र मांचे आयोजन करण्यात आले होते. मूळ मराठवाड्यातील उच्चपदस्थ व्यक्तींना या वेळी सन्मानित करण्यात आले.
नवी मुंबई आणि पनवेल परिसरात देशाच्या कानाकोपºयातून नोकरी व्यवसायानिमित्त बहुभाषिक लोक स्थायिक झाले आहेत. त्यामध्ये मराठवाड्यातील नागरिकांची संख्या लक्षणीय आहे. या सर्वांनी एकत्रित येऊन मराठवाडा मित्र परिवाराची सहा वर्षांपूर्वी स्थापना केली.
रविवारी मराठा मुक्ती संग्राम दिनानिमित्त खांदा वसाहतीत साईनंदन सभागृहात कार्यक्र म आयोजित करण्यात आला होता. या वेळी पनवेलच्या महापौर डॉ. कविता चौतमोल, मनोजकुमार सोमवंशी, डॉ. हर्षल लाहोटी, डॉ. कैलास जवादे, डॉ. राहुल भातांब्रे, नगरसेविका राजेश्री वावेकर, पुष्पा कुत्तरवडे, अॅड. क्र ांती चापके, बालाजी घुमे यांच्यासह मूळ मराठवाडावासीय मोठ्या संख्येने उपस्थित होते. मूळच्या मराठवाड्यातील असलेल्या डॉ. कविता चौतमोल या महापौरपदी विराजमान झाल्याबद्दल त्यांचा विशेष सन्मान करण्यात आला.