‘नैना’च्या विरोधातील मोर्चा चर्चेनंतर स्थगित; प्रकल्पबाधित शेतकरी उत्कर्ष समितीचे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2023 03:17 PM2023-08-04T15:17:08+5:302023-08-04T15:18:11+5:30
हजारोंच्या संख्येने शेतकरी विधिमंडळाच्या दिशेने पायी लाँग मार्चमध्ये सहभागी झाले. दरम्यान, राज्य सरकारने चर्चा केल्यानंतर मोर्चा स्थगित करण्यात आला.
नवीन पनवेल : ‘नैना’ प्रकल्पाविरोधात पनवेलमधून शेतकऱ्यांचा पायी लाँग मार्च निघाला. यामध्ये अनेक शेतकरी सहभागी झाले होते. यावेळी ‘नैना हटाव, शेतकरी बचाव’, अशा घोषणा देण्यात आल्या. शुक्रवारी सकाळी ९ वाजता छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ नैना प्रकल्पबाधित शेतकरी उत्कर्ष समितीचे पदाधिकारी शेतकरी आणि महाविकास आघाडीचे नेते एकत्र जमले. छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबडेकर यांना अभिवादन करून मोर्चा निघाला. हजारोंच्या संख्येने शेतकरी विधिमंडळाच्या दिशेने पायी लाँग मार्चमध्ये सहभागी झाले. दरम्यान, राज्य सरकारने चर्चा केल्यानंतर मोर्चा स्थगित करण्यात आला.
पनवेल, उरण परिसरात येऊ घातलेल्या नैना प्रकल्पाविरोधात आवाज उठविण्यासाठी शेकापचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि माजी आमदार बाळाराम पाटील यांच्या नेतृत्वाखाली लाँग मार्च काढण्यात आला. पनवेल येथील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक ते मुंबईतील आझाद मैदान, असा मोर्चा काढण्यात येणार होता. यामध्ये माजी आमदार बाळाराम पाटील, माजी आमदार पंडित पाटील, माजी नगराध्यक्ष जे.एम. म्हात्रे, शिवसेना नेते बबन पाटील, सभापती नारायण घरत, काँग्रेस नेते आर.सी. घरत, काँग्रेस नेते महेंद्र घरत, शिवसेना नेते शिरीष घरत, माजी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे, कामगार नेते सुरेश ठाकूर, अन्य नेते, माजी नगरसेवक, शेतकरी, तसेच पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सानपाड्यात मोर्चा स्थगित : ‘नैना’विरोधात काढण्यात आलेला मोर्चा दुपारी खारघरपर्यंत गेल्यानंतर शासनाकडून शिष्टमंडळाला चर्चेसाठी बोलविण्यात आले. तोपर्यंत मोर्चा सानपाड्यापर्यंत पोहोचला होता. ‘नैना’ शिष्टमंडळ मंत्रालयात गेले असताना रायगडचे पालकमंत्री उदय सामंत यांच्यात चर्चा झाली. त्यांनी दहा ते बारा दिवसांत सिडको, पालकमंत्री आणि ‘नैना’चे शिष्टमंडळ यांच्यासोबत बैठक घेणार असल्याचे सांगितले.
आमचा विरोध कायम : शिस्तबद्ध पद्धतीने शेतकरी, नागरिक, ग्रामस्थ या मार्चमध्ये सहभागी झाले. नैना प्रकल्प आम्हाला नकोच, आमच्या जमिनी फुकट घेणाऱ्या नैनाला आमचा विरोध आहे. ‘जमीन आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची’ अशा घोषणांनी आसमंत दुमदुमला होता. या लाँग मार्चसाठी मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.