नेरूळ-उरण रेल्वेच्या पहिल्या टप्प्याला मार्चचा मुहूर्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2018 02:18 AM2018-02-06T02:18:58+5:302018-02-06T02:22:24+5:30
नेरूळ-उरण रेल्वे मार्गाच्या पहिल्या टप्प्याचे काम प्रगतिपथावर आले आहे. या टप्प्यातील रेल्वेमार्ग आणि इतर आत्यावश्यक कामे पूर्ण झाली
नवी मुंबई : नेरूळ-उरण रेल्वे मार्गाच्या पहिल्या टप्प्याचे काम प्रगतिपथावर आले आहे. या टप्प्यातील रेल्वेमार्ग आणि इतर आत्यावश्यक कामे पूर्ण झाली असून सध्या रेल्वे स्थानकांच्या कामांना गती देण्यात आली आहे. मार्च २0१८पर्यंत पहिल्या टप्यातील खारकोपपर्यंत रेल्वे सेवा सुरू करण्याचा निर्धार सिडकोने व्यक्त केला आहे.
सिडकोने जुलै १९९७मध्ये नेरूळ-उरण या २७ किमी लांबीच्या रेल्वेमार्गाचा प्रस्ताव तयार केला होता. परंतु विविध कारणांमुळे हा प्रकल्प कागदावरच सीमित राहिला होता. अखेर जून २0१२पासून या प्रकल्पाच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्यात आली. सिडको व रेल्वे यांच्या संयुक्त सहकार्याने उभारण्यात येत असलेल्या या मार्गावर १0 स्थानके आहेत, तर या संपूर्ण प्रकल्पाचा खर्च दोन हजार कोटींच्या घरात आहे. या संपूर्ण मार्गावर चार उड्डाणपूल बांधण्यात येणार आहेत. त्यापैकी उलवे खाडीवरील सर्वांत मोठ्या उड्डाणपुलाचे काम पूर्ण झाले आहे. या मार्गावरील पाचव्या क्रमांकाच्या खारकोपर स्थानकाचे काम प्रगतिपथावर आहे. तर त्यापुढील चार किलोमीटरच्या पट्ट्यात खारफुटी व भूसंपादनाचा अडथळा निर्माण झाल्याने हे काम रखडले होते. परंतु आता हा अडथळाही दूर झाल्याने पुढील टप्प्यासाठी सिडकोने कंबर कसली आहे. दरम्यान, तूर्तास खारकोपपर्यंतच्या पहिल्या टप्प्यावर अधिक भर दिला जात आहे. पुढील दोन-अडीच महिन्यांत उर्वरित कामे पूर्ण करून मार्च २0१८पर्यंत प्रत्यक्ष रेल्वे सेवा सुरू करण्याचा निर्धार सिडकोच्या संबंधित विभागाने व्यक्त केला आहे.
>तरघर स्थानक ठरणार वास्तुशिल्पाचा उत्कृष्ट नमुना
मार्गावर तरखर हे भव्य व दिव्य रेल्वे स्थानक ठरणार आहे. या स्थानकासाठी तब्बल ११२ कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. यात २७0 मीटर लांबीचे चार फलाट प्रस्तावित करण्यात आले आहेत. स्थानकाच्या इमारतीत वाणिज्य कॉम्प्लेक्स उभारले जाणार आहे. यात विविध कार्यलयांसह दोन तिकीट कार्यालये असणार आहेत. तर स्थानकाच्या पहिल्या मजल्यावर प्रशस्त वाहनतळ प्रस्तावित करण्यात आले असून वाहनतळावर जाण्यासाठी रॅम्पची सुविधा असणार आहे.
डिसेंबर २0१७ची डेडलाइन हुकली : या मार्गावर नेरूळ-सीवूड्स, सागरसंगम, तरघर, बामणडोंगरी, खारकोपर गव्हाण, रांजणपाडा, न्हावा-शेवा, डोंगरी व उरण या १० स्थानकांचा समावेश आहे. डिसेंबर २0१७मध्ये पहिला टप्पा सुरू करण्याचे सिडकोकडून जाहीर केले होते. परंतु विविध कारणांमुळे कामाची गती मंदावल्याने आता मार्च २0१८ची डेडलाइन देण्यात आली आहे.