लोकमत न्यूज नेटवर्कपनवेल : तळोजा वसाहतीत वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. दिवसातील तीन ते चार वेळा अघोषित लोड शेडिंगने हैराण झालेल्या रहिवाशांनी बुधवारी महावितरणच्या भिंगार येथील कार्यालयावर धडक दिली. स्थानिक नगरसेवक व रहिवाशांनी आधिकाऱ्यांसोबत चर्चा करीत यासंदर्भात मार्ग काढण्याची विनंती या वेळी तळोजावासीयांनी केली. या वेळी महावितरणचे अधिकारी डी. बी. गोसावी यांना यासंदर्भात जाब विचारला. तळोजामधील रहिवाशांना वारंवार वीजपुरवठा खंडित होण्याच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. तसेच लाइट बिलातदेखील चार ते पाचपट वाढ झाल्याने येथील रहिवाशांनी संताप व्यक्त केला. तळोजामधील फिडरच्या कामाला वारंवार अडथळे निर्माण होत असल्याने ही समस्या उद्भवत असल्याने वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याचे नगरसेवक हरेश केणी यांनी सांगितले. पावसामुळे कामात अडथळा निर्माण होत असल्याचे महावितरणच्या अधिकाऱ्यांच्या मार्फत सांगण्यात येत आहे. हे लवकर करण्याच्या सूचना आम्ही महावितरण अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. तसेच वाढीव बिलासंदर्भातही विचारणा महावितरण अधीकारी डी. बी. गोसावी यांना करण्यात आल्या. यासंदर्भात बिघाड झालेल्या मीटरची पाहणी त्वरित करण्यात येईल, असे गोसावी यांनी सांगितले. या वेळी उपस्थितांमध्ये नगरसेवक हरेश केणी, नगरसेवक आप्पा पटेल, रहिवासी शाजान चौगुले यांच्यासह रहिवासी उपस्थित होते.
तळोजावासीयांचा महावितरणवर मोर्चा
By admin | Published: June 29, 2017 3:03 AM