झोपड्या, उद्यानांसह मोकळ्या जागांमधून निघतोय गांजाचा धूर, नवी मुंबई पोलिसांचे कोम्बींग ऑपरेशन
By नामदेव मोरे | Published: August 16, 2023 08:49 PM2023-08-16T20:49:10+5:302023-08-16T20:49:27+5:30
Crime: नवी मुंबई शहरातील अवैध झोपडपट्या, उद्याने, मोकळे भूखंड, इमारतींमधून गांजाचा धूर येऊ लागला आहे. गांजा विक्री करणारे व ओढणारांविरोधात पोलिसांनी मोहीम सुरू केली आहे.
- नामदेव मोरे
नवी मुंबई - शहरातील अवैध झोपडपट्या, उद्याने, मोकळे भूखंड, इमारतींमधून गांजाचा धूर येऊ लागला आहे. गांजा विक्री करणारे व ओढणारांविरोधात पोलिसांनी मोहीम सुरू केली आहे. १५ ऑगस्टला कोम्बींग ऑपरेशन राबवून गांजा ओढणाऱ्या सहा जणांवर गुन्हा दाखल केला आहे. दारू विक्री करणारांवरही कारवाई केली आहे.
नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलींद भारांबे यांनी पदभार स्विकारल्यापासून शहरातील अवैध व्यवसायांविरोधात मोहीम सुरू केली आहे. आयुक्तालय परिसरातील अवैध झोपडपट्ट्या, बंद पडलेल्या इमारती, उद्याने, मैदाने, मोकळे भूखंड, दाट झाडी असलेल्या परिसरामध्ये गांजा विक्री व ओढणारांचे अड्डे तयार झाले आहेत. सीबीडी, नेरूळ, तुर्भे, एमआयडीसी परिसरामध्ये हे प्रमाण जास्त आहे. या सर्व ठिकाणांवर विशेष लक्ष दिले जात असून अमली पदार्थ विक्री करणारांबरोबर ओढणारांवरही कारवाई केली जात आहे. स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभुमीवर नवी मुंबई, पनवेल, उरण परिसरामध्ये कोम्बींग ऑपरेशन राबविण्यात आले होते. पोलिसांनी विविध ठिकाणी छापे मारून व झडती घेऊन गांजा ओढणाऱ्या सहा जणांना ताब्यात घेतले व त्यांच्यावर गुन्हे दाखल केले आहेत.
शहरात अवैध दारू विक्रीच्या अड्यांमध्येही वाढ झाली आहे. स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी दारू विक्रीची दुकाने बंद असल्यामुळे अवैध विक्रीच्या अड्यांवरून दारूचा पुरवठा केला जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी विविध ठिकाणी छापा टाकून चार जणांना ताब्यात घेतले असून दारू चा साठाही जप्त केला आहे. यापुढेही अमली पदार्थ व दारू विक्रेत्यांविरोधात मोहीम सुरू ठेवली जाणार आहे.
१५ ऑगस्ट दिवशी गांजा ओढणारांवरील कारवाई पुढील प्रमाणे
- नेरूळ सेक्टर २ मधील चिंचोली तलावाजवळून सायंकाळी साडेसहा वाजता अनिकेत तुपे या तरूणाला गांजा ओढताना ताब्यात घेतले.
- चिंचोली तलाव परिसरातून याच दरम्यान अविनाश पाटील या तरूणासही गांजा ओढताना ताब्यात घेतले.
- उलवे सेक्टर १९ मधून मध्यरात्री दोन वाजता जैनुद्दीन शेख याला गांजा ओढताना ताब्यात घेतले.
- दुर्गामाता झोपडपट्टीजवळील तलावाच्या बाजूला गांजा ओढणाऱ्या पंकज शर्मा याला ताब्यात घेतले.
- पारसीक हिल टेकडीकडे जाणाऱ्या रोडवर संतोष निषाद गांजा ओढताना ताब्यात घेतले.
- राजीव गांधी स्टेडीयमच्या बाजूला सव्वादोन वाजता भरत देवेंद्रन गांजा ओढताना ताब्यात घेतले.
दारू विक्री करणारांवर केलेली कारवाई
- कोपरी गाव सेक्टर २६ मधून भुषण ठोंबरे स्कुटीमधून दारू घेऊन जात असताना रात्री साडेनऊ वाजता ताब्यात घेतले.
- श्रमीकनगर अवैध दारू विक्री करणाऱ्या शंकर राठोडवर गुन्हा.
- नेरूळ एलपी ब्रीजजवळ रशिद शेख शिरवणे सेक्टर १ दारू विक्री करत असताना अटक केली.
- सीबीडी सेक्टर १० मेट्रो पुलाच्या खाली अवैध दारू विक्री करणाऱ्या रविंद्र वानखेडेवर गुन्हा