- नामदेव मोरे
नवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्यालयासह इतर जुन्या इमारतींची प्रशासनाने वेळेत डागडुजी केली नाही. परिणामी, इमारतींचे बांधकाम जर्जर होऊ लागले आहे. मसाला मार्केटमधील मध्यवर्ती सुविधागृह इमारतीची अवस्था बिकट झाली असून, ती कधीही कोसळण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
बाजार समिती प्रशासन स्वत:च्या मालमत्तांची योग्य काळजी घेत नसल्याचे स्पष्ट होऊ लागले आहे. १९८१ पासून येथील ७२ हेक्टर आवारामध्ये अनेक इमारती उभारण्यात आल्या आहेत; परंतु त्यांची वेळेवर देखभाल दुरुस्ती व वापर करण्यात आला नाही. परिणामी, अनेक इमारतींची स्थिती बिकट झाली आहे. मसाला मार्केटमध्ये १९९१ पूर्वी चार मजल्यांचे मध्यवर्ती सुविधागृह बांधण्यात आले आहे.
यामध्ये बाजार समितीचे प्रशासकीय कार्यालय, नवी मुंबई मर्चंट चेंबरच्या कार्यालयासह एकूण २७२ कार्यालये आहेत. या इमारतीच्या बाहेरून कधीच रंगरंगोटी करण्यात आली नाही. परिणामी, बांधकाम धोकादायक बनले आहे. इमारतीचे प्लॅस्टर अनेक ठिकाणी कोसळले आहे. विविध ठिकाणी भेगा पडल्या आहेत. बाजार समितीने या इमारतीचे व्हीजेटीआयकडून संरचनात्मक लेखा परीक्षण करून घेतले आहे. इमारतीची पुनर्बांधणी करण्याची आवश्यकता असल्याचा रिपोर्ट देण्यात आला असून, प्रशासनाने इमारत धोकादायक घोषित करण्यासाठी महापालिकेकडे पाठपुरावा केला आहे. कांदा-बटाटा मार्केटमधील मुख्यालयाची स्थितीही बिकट आहे. छताचे प्लॅस्टर पडून आतमधील लोखंडी सळई दिसू लागल्या आहेत. छत कोसळू नये, यासाठी लोखंडी खांबाचे टेकू देण्यात आले आहेत. प्रशासनाने इमारतीच्या रंगरंगोटीचे काम सुरू केले आहे; पण ठेकेदाराने रंगरंगोटीही व्यवस्थित केलेली नाही.
मसाला मार्केटच्या बाजूलाही मध्यवर्ती सुविधागृह इमारत आहे. त्या इमारतीच्या देखभालीकडेही दुर्लक्ष करण्यात आले आहे. अनेक ठिकाणी इमारतीचे प्लॅस्टर निखळले आहे. संरक्षण भिंतीवर आरटीओच्या भंगार गाड्या टाकल्या असून, तारेचे कुंपण वाकले आहे. बाजार समिती प्रशासन या इमारतीकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत आहे. फळ मार्केटमध्येही मध्यवर्ती सुविधागृह व निर्यात भवन या दोन इमारती आहेत. या दोन्ही इमारतींनाही अद्याप कधीच रंगरंगोटी करण्यात आलेली नाही. इमारतीला बाहेरून रंग लावणे व इतर दुरुस्तीची कामे केली जात नसल्यामुळे त्या इमारतीही धोकादायक होण्याची शक्यता आहे. सद्यस्थितीमध्ये फक्त फळ मार्केट व धान्य मार्केटमधील इमारतीची स्थिती ठीक आहे.