बाजार समिती निवडणुकीसाठी अर्जांची छाननी पूर्ण, यादी आज प्रसिद्ध होणार
By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2020 11:37 PM2020-01-30T23:37:01+5:302020-01-30T23:37:18+5:30
संपूर्ण राज्याचे लक्ष मुंबई बाजार समितीच्या निवडणुकीकडे लागले आहे.
नवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीसाठीच्या उमेदवारी अर्जांची गुरुवारी छाननी करण्यात आली. १८ जागांसाठी १८२ जणांनी तब्बल २६३ अर्ज दाखल केले आहेत. शुक्रवारी उमेदवारांची अंतिम यादी जाहीर केली जाणार असून, १४ फेब्रुवारीपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहेत.
संपूर्ण राज्याचे लक्ष मुंबई बाजार समितीच्या निवडणुकीकडे लागले आहे. यापूर्वीच्या निवडणुकांमध्ये सहा महसूल आयुक्तालयांमध्ये तेथील उमेदवारांना अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. परंतु यावेळी सर्व १८ जागांसाठी मुंबई बाजार समितीमधूनच निवडणूक प्रक्रिया राबविली जात आहे. यामुळे राज्याच्या कानाकोपऱ्यातून उमेदवारांनी अर्ज भरण्यासाठी मुंबईत हजेरी लावली होती. गुरुवारी उमेदवारी अर्जांची छाननी करण्यात आली. यावेळी सर्व उमेदवार व त्यांच्या सूचकांना हजर राहण्यास सांगितले होते. बाजार समिती परिसरामध्ये पाचशेपेक्षा जास्त पदाधिकारी उपस्थित राहणार असल्यामुळे त्यांच्यासाठी तंबू टाकून बसण्याची व्यवस्था केली होती. प्रत्येक महसूल विभागानुसार बाजार समिती मुख्यालयाच्या चौथ्या मजल्यावर छाननीची सुविधा सुरू करण्यात आली. दुपारी दोन वाजता सर्व प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे.
महसूल विभागाच्या सर्व अर्जांची छाननी निर्विघ्नपणे पूर्ण झाली आहे. बाजार समितीमधील एका उमेदवाराच्या अर्जावर आक्षेप घेण्यात आला आहे. प्रत्येक उमेदवाराने डमी अर्जही भरले होते. १८२ जणांनी तब्बल २६३ अर्ज भरले आहेत. यामुळे एक अर्ज पात्र ठरल्यानंतर उरलेले बाद करण्यात येणार आहेत.
छाननी करून अंतिम यादी शुक्रवारी बाजार समितीमध्ये प्रसिद्ध करण्यात येणार असल्याची माहिती निवडणूक विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.
निवडणुकीचा तपशील
३१ जानेवारी - उमेदवारांची अंतिम यादी जाहीर होणार
१४ फेब्रुवारी - अर्ज मागे घेण्यासाठी मुदत
१५ फेब्रुवारी - अंतिम यादी जाहीर होऊन चिन्हांचे वाटप
२९ फेब्रुवारी - मतदान
२ मार्च - मतमोजणी
दोन ठिकाणी बिनविरोध निवड
बाजार समिती निवडणुकीसाठी हमाल गटातून माजी मंत्री शशिकांत शिंदे यांचे चार अर्ज दाखल झाले आहेत. दुसºया कोणीही अर्ज दाखल केलेला नाही. यामुळे त्यांची निवड बिनविरोध होणार असल्याचे निश्चित झाले आहे. फळ मार्केटमधूनही फक्त संजय पानसरे यांचेच चार अर्ज दाखल झाले आहेत. इतर कोणाचाही अर्ज दाखल झालेला नाही. यामुळे त्यांचीही निवड बिनविरोध होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
महसूल विभागानुसार अर्जांचा तपशील
महसूल विभाग अर्ज
औरंगाबाद ४४
नागपूर २१
अमरावती ३७
पुणे ३२
कोकण १४
नाशिक ६१
हमाल ४
कांदा मार्केट १४
भाजी मार्केट ११
धान्य मार्केट १२
मसाला मार्केट ९
फळ मार्केट ४