- नामदेव मोरेनवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या भाजी मार्केटमध्ये कोबी, फ्लॉवर व इतर भाजीपाल्याच्या कचºयातून रोज लाखो रुपयांची उलाढाल होत आहे. एपीएमसीच्या परवानगीशिवाय वर्षानुवर्षे तबेल्यांसाठी चारा पुरविला जात आहे. आवाज उठवेल त्याच्याशी अर्थपूर्ण संधान बांधून हा प्रकार सुरू असून, प्रशासनही याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे.मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या फळ व भाजी मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात ओला कचरा निर्माण होत असतो. भाजी मार्केटमध्ये खराब झालेला माल व कोबी, फ्लॉवरच्या पाल्याचे प्रमाण जास्त आहे. ओल्या कचºयातून खतनिर्मिती व वीजनिर्मिती करण्याचे प्रकल्प रखडल्यामुळे रोज ५० ते ६० टन कचरा महापालिकेच्या डम्पिंग ग्राउंडमध्ये टाकला जात आहे. वास्तविक भाजी मार्केटमधील कोबी,फ्लॉवरच्या पाल्याला कल्याणसह मुंबईमधील तबेले चालकांकडून मोठी मागणी आहे. रोज सकाळी तीन मोठ्या ट्रकमधून हा कचरा तबेल्यांकडे नेला जात आहे. वास्तविक बाजार समितीच्या नियमाप्रमाणे परवाना नसलेल्या ट्रक किंवा टेंपोला मार्केटमध्ये प्रवेश नाही. पाला वाहतुकीचा परवाना कोणालाही दिलेला नसताना वर्षानुवर्षे रोज १० ते २० टन ओला कचरा फुकट उचलला जात आहे. हा कचरा १ ते २ रुपये किलो दराने तबेले चालकांना विकून लाखो रुपयांची कमाई केली जात आहे. भाजी मार्केटमध्ये टेंपो व ट्रकमध्ये हा कचरा भरून बाजार समितीच्या काट्यावरच त्याचे वजन केले जात आहे. कचºयाचा घोटाळा सुरू असून, बाजार समितीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असूनही त्याकडे कोणीही गांभीर्याने लक्ष देत नाही.भाजी मार्केटमधील कचºयातही अनेकांचे अर्थपूर्ण हितसंबंध दडलेले आहेत. यापूर्वी एका गुन्हेगारी टोळीशी संबंधित असलेल्या व्यक्तीला या कचºयाच्या बदल्यात ५० हजार रुपये महिना दिले जात होते; परंतु त्याची माल घेऊन जाणाºयांशी झालेली भांडणे व पोलिसांनी कारवाईचा इशारा दिल्यानंतर त्याला दिला जाणारा मोबदला कमी करण्यात आला आहे. आतापर्यंत जो आवाज उठवेल त्याला त्याच्या क्षमतेप्रमाणे १५ ते २५ हजार रुपये देऊन गप्प केले जात आहे. या कचºयाचा मोबदला कोणाला किती दिला जातो, याविषयी मार्केटमध्ये उघडपणे चर्चा केली जाते.काही वर्षांपूर्वी पोलीस स्टेशनपर्यंत हे प्रकरण गेले व त्यामध्ये अनेकांनी स्वत:चा अर्थपूर्ण हेतू साध्य करून घेतला होता. ज्याचा मार्केटशी काहीही संबंध नाही ते कचºयातून कमाई करत आहेत; पण बाजार समितीने मात्र याकडे कधीच गांभीर्याने लक्ष दिले नाही. ज्यांना यामधील अर्थकारण माहिती आहे त्यांनी हा कचरा आहे, फुकट घेऊन गेल्यामुळे बाजार समितीचाच फायदा असल्याचे पटवून देण्यामध्ये बुद्धी खर्ची घातली आहे.कचºयातील भाजी, फळे मार्केटमध्ये विक्रीलाभाजी व फळ मार्केटमध्ये खराब माल कचºयामध्ये फेकून दिला जातो. परप्रांतीय कामगार व काही महिला कचºयातून भाजीपाला व फळे वेचून तो सानपाडा स्टेशन, फळ मार्केटसमोरील पदपथ व इतर ठिकाणी त्याची विक्री करत आहेत. खराब मालामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्याची भीती व्यक्त केली जात आहे.लिलाव करावाएपीएमसीमधून तबेल्यांना ओला कचरा पुरविण्यामध्ये मोठा अर्थमय व्यवहार सुरू असून तो तत्काळ थांबविण्यात यावा. तबेल्यांसाठी माल घेऊन जायचा असेल तर त्याचा लिलाव करावा किंवा निविदा काढून ठेका देण्यात यावा. विनापरवाना वाहतूक करणाºयांना मार्केटमध्ये येण्यास बंदी घालण्याची मागणी होऊ लागली आहे.
बाजार समितीमध्ये कचरा घोटाळा!; कचऱ्यातील भाजीपाल्याचा तबेल्यांना पुरवठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 01, 2018 3:11 AM