नवी मुंबई : दिवाळीनिमित्ताने बाजारात आकर्षक आकाश कंदील, आकर्षक पणत्या, रांगोळ्या, दीपमाळा, सुगंधी उटणे, फराळ, फटाके आदी वस्तूंनी बाजारपेठ सजल्या असून खरेदीसाठी नागरिकांची गर्दी होत आहे. बाजारात उपलब्ध असलेल्या तयार फराळालाही मागणी वाढली आहे.
विधानसभा निवडणुकीनंतर आता दिवाळीच्या तयारीची सुरु वात झाली आहे. पावसानेही उघडीप घेतल्याने दिवाळीच्या खरेदीसाठी बाजारपेठ गजबजू लागल्या आहेत. दिवाळीनिमित्ताने वेगवेगळे पदार्थ बनविण्यासाठी किराणा माल घेण्याबरोबरच फराळाचे तयार पदार्थ घेण्याकडेही नागरिकांचा कल वाढला आहे. बाजारात विक्रीसाठी निरनिराळे आकर्षक आकाश कंदील, विद्युत दिव्यांच्या माळा उपलब्ध झाल्या असून नागरिकांना आकर्षित करीत आहेत.
पारंपरिक मातीच्या पणत्यांबरोबर चिनी मातीच्या नक्षीदार पणत्याही मोठ्या बाजारात उपलब्ध झाल्या आहेत. भेट म्हणून देण्यासाठी मिठाईचा वापर केसर पेढा, मलाई बर्फी, काजू कतली आदी विविध प्रकारच्या मिठाईचा वापर केला जातो; परंतु दुधाच्या भावासह ड्रायफ्रुट्सच्या दरात मागील वर्षांच्या तुलनेत या वर्षी वाढ झाल्याने मिठाईचे दर वाढले आहेत, त्यामुळे बाजारात उपलब्ध असलेल्या विविध आकर्षक चॉकलेट खरेदी करण्याकडे नागरिकांचा भर आहे. शहरात फटाक्यांचे स्टॉल लावण्यासाठी परवानग्यांची पूर्तता झाली असून, स्टॉल उभारण्याचे काम सुरू झाले आहे.