- अरुणकुमार मेहत्रेकळंबोली : पनवेल महापालिका क्षेत्रात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. प्रशासनाकडून उपाययोजना करण्यात येत असल्या तरी नागरिकांकडून म्हणावे तसे गांभीर्याने घेतले जात नसल्याचे दिसून येत आहे. मार्केटमध्ये गर्दी वाढू लागल्याने प्रादुर्भाव आणखी वाढण्याची शक्यता आहे.
बाजारपेठेतील दुकाने सुरू झाल्याने कापड मार्केट, भांडी मार्केट, भाजी मार्केटमध्ये झुंबड उडत आहे. या ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचेही पालन होताना दिसत नाही. पनवेल तालुका रेड झोनमध्ये येत असला तरी चौथ्या लॉकडाउनमध्ये नियम-अटी शिथिल करण्यात आल्या आहेत. त्यानुसार ११ मेपासून काही दुकाने वारनिहाय सकाळी ७ ते सायंकाळी ५ या वेळात सुरू करण्याची परवानगी देण्यात आली आहे.
मात्र दुकानदारांसह नागरिकांकडूनही नियमांची पायमल्ली करण्यात येत आहे. त्यामुळे बाजारपेठ गजबजलेली दिसून येत आहे. गुरुवार, शुक्रवारी खरेदीसाठी झुंबड उडाल्याने वाहतूककोंडीही झाली होती. अनेकांकडून स्थगित लग्नकार्याच्या खरेदीची लगबग सुरू असून ग्रामीण भागातील नागरिकांचीही मार्केटमध्ये मोठी वर्दळ दिसून येत आहे.
दुकानासमोर वाहनांचे पार्किंग
गेल्या दोन दिवसांपासून पनवेल बाजारपेठ गजबजली आहे. दुचाकी, चारचाकी गाड्यांमुळे अनेक ठिकाणी वाहतूककोंडी झाली होती. मिळेल त्या जागेवर वाहने पार्क केली जात आहेत. त्यावर निर्बंध राहिले नाहीत. वाहनावरील कारवाई थंडावल्याने वाहनचालक सैराट झाले आहेत. उरण नाका, शिवाजी मार्केट, गणेश मार्केट, जुने पनवेल मार्केटमध्ये वाहनांची कोंडी होत आहे.
पनवेल मार्केटमध्ये दररोज होणारी गर्दी चिंता वाढविणारी आहे. ठरवून दिलेल्या नियमाचे दुकानदार, व्यावसायिकांकडून उल्लंघन होत असल्यास पालिकेकडून कारवाई करण्यात येते. ठरवून दिलेल्या दिवसांनुसारच दुकाने सुरू ठेवता येणार आहेत. त्याव्यतिरिक्त इतर दुकाने सुरू ठेवत असतील तर त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल.- जमीर लेंगरेकर, उपायुक्त, पनवेल महापालिका