हुतात्मा नाग्या कातकरी यांच्या चिरनेरमधील ३० कुटुंबांची चांदायली आदिवासीवाडी ७५ वर्षांपासून अंधारात
By ऑनलाइन लोकमत | Published: July 4, 2023 08:47 PM2023-07-04T20:47:16+5:302023-07-04T20:47:26+5:30
मधुकर ठाकूर उरण : चिरनेर ग्रामपंचायत हद्दीतील चांदायली आदिवासी वाडीतील ३० कुटुंब ७५ वर्षांपासून अंधारात चाचपडत आहे. उरण तालुक्यातील ...
मधुकर ठाकूर
उरण : चिरनेर ग्रामपंचायत हद्दीतील चांदायली आदिवासी वाडीतील ३० कुटुंब ७५ वर्षांपासून अंधारात चाचपडत आहे. उरण तालुक्यातील चिरनेर ग्रामपंचायत हद्दीतील चांदायली कातकरी आदिवासी वाडीत स्वतंत्र्याच्या अमृत महोत्सवाची ७५ वर्ष उलटून गेल्यानंतरही अद्यापही या वाडीमध्ये आजही रस्ते, पाणी, वीज , शाळा, शौचालय यासारख्या महत्त्वाच्या कोणत्याही मूलभूत सुविधा नसल्याने येथील मुलांचे वर्तमान व भविष्य अंधारात आहे.
चिरनेर या इतिहास प्रसिद्ध गावाच्या हद्दीत येणारी चांदायली आदिवासी वाडी ही गेल्या पन्नास साठ वर्षापासून अस्तित्वात आहे. या वाडीत ३० कुटुंबांची लोकवस्ती आहे. मात्र अद्याप या वाडीवर वीज पुरवठा झालेला नाही. त्यामुळे येथील आदिवासी बांधव अंधारात जीवन जगत आहेत. त्यांच्या या मागणीकडे अद्यापपर्यंत कोणीही लक्ष दिलेले नाही.विजेचे जाळे सर्वत्र पसरले असतानाही, या वाडीवर अद्याप विज आलेली नाही. दरम्यान आदिवासींसाठी सरकारने स्वतंत्र विभाग सुरू केला आहे. मात्र प्रत्यक्षात त्यांच्यापर्यंत सरकारच्या काही सुविधा पोहोचत नसल्याचे आश्चर्य वाटते .दरवर्षी अनेकदा मतदान होते.
पुढारी आश्वासने देतात. पण प्रत्यक्षात कृतीत कोणतेही काम येत नसल्यामुळे येथील आदिवासी राजकीय पुढाऱ्यांवर नाराज आहेत. चिरनेर या इतिहास प्रसिद्ध गावातील आदिवासी हुतात्मा नाग्या महादू कातकरी यांनी चिरनेर जंगल सत्याग्रहाच्या स्वातंत्र्य रणसंग्रामाच्या लढ्यात स्वातंत्र्यप्राप्तीसाठी आपल्या प्राणाची आहुती दिली. देशाच्या स्वातंत्र्य प्राप्तीसाठी आदीवासी बांधवांचे मोठे योगदान असताना देश स्वतंत्र्य होण्याला ७५ वर्ष उलटून जाऊनही आजही या आदिवासी वाड्यांपर्यंत विकासाची किरणे पोहोचली नाहीत. परिणामी येथील आदिवासी बांधव पारतंत्र्यात जीवन जगत आहेत. सरकार विरोधात तीव्र संताप व्यक्त करीत आहेत .या ठिकाणी विज पुरवठा करण्यासंदर्भात अनेक वेळा मागणी करूनही याकडे कोणीही लक्ष न दिल्यामुळे हे आदिवासी बांधव अंधारातच जीवन जगत आहेत.
चांदायली आदिवासी वाडीतील ३० कुटुंबांना वीजपुरवठा करण्यात यावा या मागणीसाठी चिरनेर येथील सामाजिक कार्यकर्ते सचिन घबाडी , आदिवासी कार्यकर्ते अमर कातकरी, राजू कातकरी, भरत कातकरी ,यशवंत कातकरी, महेंद्र कातकरी, जयवंत कातकरी, सुधीर कातकरी यांनी उरण वीज महामंडळाचे मुख्य अभियंता विजय सोनवणे यांची सोमवारी (३) भेट घेऊन निवेदन दिले.
चांदायली आदिवासी वाडीपर्यंत वीजपुरवठा करण्यासाठी प्रयत्न सुरू करण्यात आले होते. वीजेचे पोलही टाकण्यात आले होते.मात्र वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी कारवाई करत वीजेचे पोल काढून जप्त केले.अधिकाऱ्यावरही दंडात्मक कारवाई केली. दंडात्मक कारवाईपोटी वीजमंडळाला २० हजार रुपये दंड भरावा लागला.आता मात्र वनविभागाची परवानगी घेऊन काम केले जाणार आहे. परवानगीसाठी वनविभागाला पत्रही पाठविण्यात आले असल्याची माहिती उरण वीजवितरण मंडळाचे उप अभियंता विजय सोनवणे यांनी दिली.