एमआयडीसीमधील कंपनीला भीषण आग; जीवितहानी हानी, पाच तासांनी आग आली आटोक्यात
By सूर्यकांत वाघमारे | Published: January 4, 2024 07:22 PM2024-01-04T19:22:19+5:302024-01-04T19:22:26+5:30
पावणे एमआयडीसी मधील मेहक या कंपनीत आग लागल्याची घटना गुरुवारी सकाळी घडली.
लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई : पावणे एमआयडीसी मधील मेहक या कंपनीत आग लागल्याची घटना गुरुवारी सकाळी घडली. कंपनीत काम सुरु असताना हि दुर्घटना घडली असून आगीचे नेमके कारण स्पष्ट झाले नाही. तर आगीमुळे ड्रमचे स्फोट होऊन त्यामधील केमिकल रस्त्याने वाहत नाल्यात गेले असता ते देखील पेटल्याने नाल्यातही आग पसरली होती. एका कंपनीचे नुकसान झाले आहे.
गुरुवारी सकाळी साडेसातच्या सुमारास मेहक कंपनीत आग लागली. आगीची माहिती मिळताच एमआयडीसी तसेच महापालिकेच्या अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी दाखल झाले होते. अनेक वर्षांपासून कार्यरत असलेल्या या कंपनीचा प्रकल्प सलग तीन भूखंडावर पसरलेला आहे. तर कंपनीला लागूनच इतरही काही रासायनिक कंपन्या आहेत. यामुळे परिसराला आगीचा धोका निर्माण झाला होता. त्यातच आगीमध्ये उडणारा भडका व रस्त्यावरून नाल्यात वाहणारे केमिकलचे पाट यांनी देखील पेट घेतला होता.
त्यामुळे नाल्यातल्या झाडांनी देखील पेट घेऊन धुराचे लोट निघत होते. तुर्भे एमआयडीसी पोलिसांनीही त्याठिकाणी धाव घेऊन परिसरातील कंपन्यांमधील कामगारांना सुरक्षित ठिकाणी हलवले. अखेर फोमचा मारा करून अग्निशमन दलाला आगीवर नियंत्रण मिळवावे लागले. त्यामध्ये सुमारे पाच तासाच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आली. यामध्ये कोणालाही गंभीर दुखापत झाली नसून आगीच्या कारणाचा तपास सुरु असल्याचे एमआयडीसी अग्निशमन केंद्र अधिकारी संतोष पाटील यांनी सांगितले.