‘फिफा’साठीचे साहित्य विमानतळावर अडकले, इटलीवरून मागविले विद्युत फिटिंग साहित्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2017 03:52 AM2017-09-29T03:52:12+5:302017-09-29T03:52:28+5:30
फिफा’च्या सराव सामन्यांसाठी नवी मंबई महापालिकेने अत्याधुनिक सुविधा असलेले मैदान विकसित केले आहे. मैदानावरील विद्युत व्यवस्थेसाठी लागणारे साहित्य इटलीवरून मागविले असून, ते २७ सप्टेंबरला सहारा विमानतळावर आले आहे.
- नामदेव मोरे ।
नवी मुंबई : ‘फिफा’च्या सराव सामन्यांसाठी नवी मंबई महापालिकेने अत्याधुनिक सुविधा असलेले मैदान विकसित केले आहे. मैदानावरील विद्युत व्यवस्थेसाठी लागणारे साहित्य इटलीवरून मागविले असून, ते २७ सप्टेंबरला सहारा विमानतळावर आले आहे. सीमा शुल्क विभागाने सर्व प्रक्रिया तत्काळ पूर्ण केल्यास मैदानावरील विशेष विद्युत व्यवस्थेचे काम दोन दिवसांमध्ये पूर्ण करता येणार आहे. यासाठी महापालिका प्रशासनाने सीमा शुल्क विभागाकडे विशेष विनंती केली आहे.
नवी मुंबईमधील डॉ. डी. वाय. पाटील मैदानावर ६ ते २५ आॅक्टोबर दरम्यान १७ वर्षांखालील ‘फिफा’ विश्वचषकाचे सामने होणार आहेत. या सामन्यांसाठी येणाºया खेळाडूंना सराव करण्यासाठी वाशीतील नवी मुंबई स्पोर्ट क्लब व नेरुळ सेक्टर १९ मधील महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण मैदानावर सराव सामने होणार आहेत. महापालिकेने ‘फिफा’साठी अद्ययावत मैदान विकसित केले आहे. या मैदानावर विशेष विद्युत व्यवस्था करण्यात येत आहे. ३०० एलयूएक्स लेवल एवढी प्रकाश व्यवस्था करणे आवश्यक आहे. यासाठी १ कोटी ३६ लाख ३६ हजार रुपये खर्च होणार आहेत. विद्युत व्यवस्थेसाठीचे पोल व इतर साहित्य भारतामधूनच उपलब्ध केले असले, तरी विद्युत फिटिंग ‘फिफा’च्या स्टँडर्डप्रमाणे बसविण्यात येणार असून, ते साहित्य इटलीवरून मागविले आहे.
‘फिफा’साठी महापालिकेने विकसित केलेल्या मैदानावर बसविण्यात येणारे विद्युत फिटिंगचे साहित्य इटलीवरून २७ सप्टेंबरला कार्गो विमानाने मुंबई विमानतळावर आले आहे. सीमा शुल्क विभागाकडून सर्व प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर साहित्य महापालिकेच्या ठेकेदाराच्या ताब्यात मिळणार आहे. एक दिवसामध्ये ही प्रक्रिया पूर्ण करून साहित्य मिळावे, यासाठी महापालिकेने प्रयत्न सुरू केले आहेत. गुरुवारी तत्काळ सीमा शुल्क विभागाच्या अधिकाºयांशी संपर्क साधून, सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. साहित्य वेळेत उपलब्ध झाले नाही, तर विद्युत व्यवस्थेचे काम पूर्ण करण्यास अडथळे येणार असून, त्याचा परिणाम सराव सामन्यांवर होण्याची भीती पालिकेच्या अधिकाºयांनी व्यक्त केली आहे.
‘फिफा’साठी वाहतूक व्यवस्थेमध्ये बदल
डॉ. डी. वाय. पाटील स्टेडियमवर होणाºया फिफा विश्वचषक सामन्यांच्या दरम्यान सायन - पनवेल महामार्गावरील वाहतूक व्यवस्थेमध्ये बदल करण्यात येत आहे. मुंब्रा-कल्याण, शिळफाटा मार्गे महापे, उरण व मुंबईकडे जाणाºया मार्गिकेवर जड व अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. कल्याण, भिवंडी, ठाणेकडून येणारी महापे मार्गे उरणकडे जाणारी जड अवजड वाहने शिळफाटा येथे येऊन ती तळोजा कळंबोली डी पाइंट कळंबोली मार्गे उरणकडे वळविण्यात येणार असून, शिळफाटाकडून महापे, रबाळे मार्गे मुंबईकडे रवाना केली जाणार आहेत. पण जड व अवजड वाहने महापेवरून तुर्भे-वाशी मार्गे मुंबईकडे जाणार नाहीत, असे आवाहन पोलीस उपआयुक्त नितीन पवार यांनी केले आहे. ६, ९, १२, १८ व २५ आॅक्टोबर रोजी सकाळी ८ ते रात्री ११ वाजण्याच्या दरम्यान हा बदल राहणार आहे.
‘फिफा’साठीची
विशेष विद्युत व्यवस्था पुढीलप्रमाणे
३० मीटर उंचीचे हायमास्ट खांब
०४ नग
हायमास्ट फाउंडेशन
०४ नग
२ किलो वॅट फिटिंग
४४ नग
हायमास्ट कंट्रोल पॅनेल
०४ नग
३ बाय २.५ चौरस मीटरची
केबल
२४०० मीटर
साडेतीन बाय ९५ मीटरची
केबल
६०० मीटर
‘फिफा’च्या सराव सामन्यांसाठी महापालिकेने नेरुळमध्ये यशवंतराव चव्हाण मैदान विकसित केले आहे. तेथील विद्युत व्यवस्थेसाठीचे पोल व इतर साहित्य देशातून व फिटिंग इटलीवरून मागविले आहे. इटलीवरून मागविलेले साहित्य विमानतळावर पोहोचले असून, सर्व प्रक्रिया पूर्ण करून साहित्य तत्काळ मिळावे, यासाठी पाठपुरावा सुरू केला आहे.
- अंकुश चव्हाण, अतिरिक्त आयुक्त, महापालिका