आरक्षणाचा सूर्य पाहण्यासाठी माथाडींची ४२ वर्षांपासून प्रतीक्षा; १९८२च्या लढ्याच्या आठवणींना उजाळा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 26, 2024 08:04 AM2024-01-26T08:04:58+5:302024-01-26T08:05:24+5:30

आंदोलकांच्या सेवेसाठी दिवसरात्र मेहनत

Mathadi have been waiting for 42 years to see the reservation | आरक्षणाचा सूर्य पाहण्यासाठी माथाडींची ४२ वर्षांपासून प्रतीक्षा; १९८२च्या लढ्याच्या आठवणींना उजाळा

आरक्षणाचा सूर्य पाहण्यासाठी माथाडींची ४२ वर्षांपासून प्रतीक्षा; १९८२च्या लढ्याच्या आठवणींना उजाळा

-नामदेव मोरे

नवी मुंबई : मराठा समाजाला आरक्षण मिळविण्यासाठी माथाडी कामगारांचे नेते अण्णासाहेब पाटील यांनी २२ मार्च १९८२ ला विधानभवनावर भव्य मोर्चा काढला होता. आरक्षण दिले नाही तर मी उद्याचा सूर्य पाहणार नाही, असा निर्धार त्यांनी केला होता. सरकारने आरक्षणाचा निर्णय घेतला नाही आणि अण्णासाहेबांनी आरक्षणासाठीचे पहिले बलिदान दिले. तेव्हापासून ४२ वर्षे माथाडी कामगार आरक्षणाचा सूर्य पाहण्यासाठी लढा देत असून, आताच्या लढ्यात आंदोलकांच्या सेवेसाठी दिवसरात्र परिश्रम घेत आहे. 

मराठा आरक्षणासाठीमनोज जरांगे-पाटील यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या आंदोलकांच्या मुक्कामाची सोय मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये केली होती. आंदोलकांच्या स्वागतासाठी व त्यांना सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी १० हजारपेक्षा जास्त माथाडी कामगार दोन दिवसांपासून रात्रंदिवस परिश्रम करीत आहेत. आरक्षणाच्या लढ्याशी माथाडी कामगारांचे भावनिक नाते आहे. माथाडी संघटनेचे संस्थापक अण्णासाहेब पाटील यांनी मराठा महासंघाच्या माध्यमातून सर्वप्रथम आरक्षणाची मागणी केली होती. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी २२ मार्च १९८२ला विधिमंडळावर मोर्चा काढला होता. एक लाखापेक्षा जास्त कामगार मोर्चामध्ये सहभागी 
झाले होते.

माथाडी नेत्यांचीही महत्त्वाची भूमिका 

आंदोलकांना राहण्यासाठी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीची मार्केट उपलब्ध करून देण्यासाठी माथाडी नेते आमदार शशिकांत शिंदे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. बाजार समिती, महानगरपालिका, पोलिस प्रशासन यांच्याशी बैठक घेऊन आंदोलकांना पाणी, जेवण, शौचालय या सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या. दोन दिवस मार्केटमध्ये थांबून तयारीवर लक्ष देत होते. अण्णासाहेबांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी माथाडी कामगारांपासून नेत्यांपर्यंत सर्वांनीच लढ्यात सक्रिय सहभाग घेतला होता.

‘तो’ सर्वांत धक्कादायक क्षण 

मोर्चाला संबोधित करताना सरकारने आजच आरक्षणाचा निर्णय घेतला नाही तर उद्याचा सूर्य मी पाहणार नाही, असा निर्धार व्यक्त केला होता. सरकारने काहीच निर्णय घेतला नाही, यामुळे २३ मार्चला सूर्योदयापूर्वी त्यांनी बलिदान दिले. माथाडी कामगारांना व मराठा चळवळीसाठी तो सर्वांत धक्कादायक क्षण होता. तेव्हापासून मराठा समाजाच्या प्रत्येक आंदोलनात माथाडी कामगार सक्रियपणे सहभागी होत आहेत. माथाडी नेते  नरेंद्र पाटील हेही लढ्यामध्ये सक्रिय सहभाग घेत आहेत. आरक्षणासाठी मनोज जरांगे-पाटील यांच्या नेतृत्वाखाली सुरू झालेल्या लढ्यातही माथाडी कामगार महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. चाळीस वर्षांपूर्वी कोयना खोऱ्यातील पठ्ठ्याने आरक्षणाची चळवळ सुरू केली. आता गोदा पट्ट्यातील मनोज जरांगे यांनी हा लढा निर्णायक टप्प्यावर नेऊन ठेवल्याचा संदेश कामगारांमध्ये फिरत आहे. 

Web Title: Mathadi have been waiting for 42 years to see the reservation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.