माथाडी कायदा बचाव समितीची उद्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक; राज्यातील कामगारांचे निर्णयाकडे लक्ष
By नामदेव मोरे | Published: December 12, 2023 07:24 PM2023-12-12T19:24:08+5:302023-12-12T19:24:35+5:30
शासनाचे लक्ष वेधण्यासाठी १४ डिसेंबरला एक दिवसीय लाक्षणिक बंदचा इशारा
नामदेव मोरे, लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई: शासनाच्या माथाडी अधिनियमातील सुधारणा विधेयकाला राज्यातील सर्व माथाडी कामगार संघटनांनी विरोध दर्शविला आहे. शासनाचे लक्ष वेधण्यासाठी १४ डिसेंबरला एक दिवसाच्या लाक्षणिक बंदचा इशारा दिला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी १३ डिसेंबरला माथाडी कायदा बचाव कृती समितीला चर्चेसाठी बोलावले आहे. या बैठकीनंतर बंदविषयी अंतीम निर्णय घेण्यात येणार आहे.
हिवाळी अधिवेशनामध्ये माथाडीअधिनियम सुधारणा विधेयक क्रमांक ३४ मांडण्यात येणार आहे. या विधेयकामुळे माथाडी कायदा खिळखिळा होणार असल्यामुळे राज्यातील सर्व प्रमुख संघटनांनी विधेयकाच्या िवरोधी भुमीका घेतली आहे. नवी मुंबईमधील माथाडी भवनमध्ये बैठक घेवून १४ डिसेंबरला राज्यव्यापी बंद करण्याचा इशारा दिला होता. सर्व बाजार समितीत्या, रेल्वे धक्के, लोह व पोलाद मार्केटसह सर्व ठिकाणचे कामगार बंदमध्ये सहभागी होणार होते. या पाश्वभुमीवर कामगार संघटनांची भुमीका समजून घेण्यासाठी १३ डिसेंबरला नागपूर विधानसभा येथे संयुक्त बैठक आयोजीत केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये होणाऱ्या बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कामगार व उद्योग मंत्रीही उपस्थित असणार आहेत.
माथाडी कायदा बचाव कृती समितीमध्ये कामगार नेते बाबा आढाव, नरेंद्र पाटील, शशिकांत शिंदे, गुलाबराव जगताप, अविनाश रामिष्टे, बळवंतराव पवार, अरूण रांजणे, राजन म्हात्रे, निवृत्ती धुमाळ, डी. एस.शिंदे,सतीशराव जाधव, शिवाजी सुर्वे यांच्यासह इतर मान्यवरांचा समावेश आहे. कृती समीतीचे प्रमुख सदस्य बैठकीसाठी नागपूरला रवाना झाले आहेत. या बैठकीमध्ये काय निर्णय होणार यावर १४ तारखेला संप होणार की नाही याविषयी निर्णय होणार असल्याची माहिती कृती समितीने पत्रकाद्वारे दिली आहे.