नवी मुंबई : राष्ट्रवादीच्या नेतृत्वाखाली वाटचाल करणाऱ्या माथाडी कामगारांच्या मेळाव्यामध्ये मुख्यमंत्र्यांसह भाजपा मंत्र्यांच्या उपस्थितीमुळे राजकीय तर्कवितर्कांना उधाण आले आहे. तुम्ही मुख्यमंत्र्यांशी जवळीक वाढविली आहे. तुम्ही अजून थोडे जवळ या असे आवाहन पणनमंत्र्यांनी केल्यामुळे भविष्यात राजकीय भूकंप होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. महाराष्ट्र राज्य माथाडी ट्रान्सपोर्ट अँड जनरल कामगार युनियन ही माथाडी कामगारांची राज्यातील सर्वात मोठी संघटना आहे. राष्ट्रवादी काँगे्रसच्या स्थापनेपासून संघटना पक्षाशी एकनिष्ठ आहे. पक्षाचा मुंबईतील स्थापना मेळावाही कामगारांनी यशस्वी केला होता. यावर्षी प्रथमच मेळाव्यामध्ये राष्ट्रवादी ऐवजी भाजपा नेत्यांची गर्दी पहावयास मिळाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, पणन मंत्री सुभाष देशमुख, कामगार मंत्री संभाजी पाटील निलंगेकर, आमदार मंदा म्हात्रे, संजय केळकर, प्रशांत ठाकूर, प्रवीण दरेकर, वैभव नाईक यांच्यासह भाजपाचे अनेक मान्यवर उपस्थित होते. संघटनेच्या बाहेरील राष्ट्रवादी काँगे्रसचे संदीप नाईक हे एकमेव आमदार मेळाव्यास उपस्थित होते. माथाडी कामगारांचे प्रश्न सोडविल्यास मी मुख्यमंत्र्यांच्या घरातील भांडी घासेन असे वक्तव्य नरेंद्र पाटील यांनी दोन महिन्यांपूर्वी केले होते. तेव्हापासून ते भाजपात जाणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. मेळाव्यामध्ये पणनमंत्री सुभाष देशमुख यांनीही अप्रत्यक्षपणे त्यांना आवाहन केले. नरेंद्र पाटील तुम्ही मुख्यमंत्र्यांच्या जवळ आला आहात. ही जवळिकता अजून वाढविण्याची गरज आहे. तुम्ही आमच्या पूर्णपणे जवळ या, बघा माथाडी कामगारांचे सर्व प्रश्न आम्ही सोडवितो असे वक्तव्य केले. यामुळे सभेच्या ठिकाणीच उलटसुलट चर्चेला उधाण आले होते. नरेंद्र पाटील यांनीही त्यांच्या भाषणामध्ये मुख्यमंत्र्यांना बोलावण्यावरून बराच गोंधळ झाल्याचे जाहीर सांगितले. भाजपा नेत्यांना कसे बोलावणार, तुम्ही भाजपात जाणार का असे प्रश्न विचारले जात होते. परंतु माझी बांधिलकी माथाडी कामगारांशी आहे. कामगारांच्या हिताला प्रथम प्राधान्य देणार असल्याचे स्पष्ट केले. मुख्यमंत्री साहेब तुम्ही कामगारांचे प्रश्न सोडवा, कामगार तुम्हाला विसरणार नाहीत असे वक्तव्य केले. प्रत्यक्षात भाजपात जाण्याचे वक्तव्य केले नसले तरी शहरात त्याविषयी जाहीरपणे चर्चा सुरू झाली आहे. अनेकांनी फोन करून विचारणा केल्याचेही पाटील यांनी स्वत:च स्पष्ट केले आहे. (प्रतिनिधी)
माथाडी नेत्यांची वाढतेय भाजपाशी जवळीक
By admin | Published: September 26, 2016 2:30 AM