नामदेव मोरे, नवी मुंबई : कोल्ड स्टोरेजमधील अनधिकृत व्यापार थांबविण्यात यावा. बाजार समितीचे कार्यक्षेत्र वाढवावे व इतर समस्यांवर चर्चा करण्यासाठी माथाडी भवनमध्ये कामगार व व्यापारी प्रतिनिधींची बैठक आयोजीत केली होती. या बैठकीमध्ये माथाडी व व्यापारी बचाव कृती समितीची स्थापना करण्याचा निर्णय घेण्यात आला.
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती आवारातील माथाडी भवनमध्ये आयोजीत या बैठकीला आमदार शशिकांत शिंदे, नरेंद्र पाटील यांच्यासह व्यापारी, कामगार प्रतिनिधीही उपस्थित होते. कोल्ड स्टोरेजमध्ये सुरू असलेला अनधिकृत व्यापार थांबविण्यात यावा. माथाडी कामगारांच्या मुलांना माथाडी मंडळाच्या सेवेत घ्यावे. सल्लागार समिती व माथाडी बोर्डाच्या पुनर्रचना करणे. व्यापारी व कामगारांच्या न्याय्य प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करणे या विषयावर चर्चा करण्यात आली. बाजार समितीचे कार्यक्षेत्र वाढविण्याची मागणी करण्याच्या विषयावरही चर्चा करण्यात आली.
या बैठकीला कांदा बटाटा, मसाला, धान्य, भाजीपाला, फळ मार्केटमधील व्यापारी संघटनांचे पदाधिकारी, मोहन गुरनानी, शंकर पिंगळे, संजय पानसरे, चंद्रकांत ढोले, कैलास ताजणे, अशोक बढीया, भिमजी भानुशाली, संजय पिंगळे, दत्तात्रय पिसाळ, अमरीश बरोट, मयुर सोनी, चंद्रकांत पाटील, गुलाबराव जगताप, रविकांत पाटील, पोपटराव देशमुख भारतीताई पाटील व इतर पदाधिकारी उपस्थित होते.