प्रलंबित प्रश्नांसाठी माथाडी कामगार आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2020 12:25 AM2020-02-25T00:25:33+5:302020-02-25T00:25:42+5:30

२६ फेब्रुवारीला लाक्षणिक संप; १८ प्रश्न सोडविण्याची शासनाकडे मागणी

Mathadi workers aggressive for pending queries | प्रलंबित प्रश्नांसाठी माथाडी कामगार आक्रमक

प्रलंबित प्रश्नांसाठी माथाडी कामगार आक्रमक

Next

नवी मुंबई : प्रशासकीय स्तरावर माथाडी कायदा संपविण्याचे कारस्थान सुरू आहे. कामगारांचे प्रश्न वर्षानुवर्षे सोडविले जात नाहीत. प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी महाराष्ट्र राज्य माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनने आक्रमक भूमिका घेतली आहे. १८ समस्यांचे निवेदन शासनाला दिले असून, हे प्रश्न मार्गी लावावेत यासाठी २६ फेब्रुवारीला लाक्षणिक संप करण्यात येणार आहे.

कामगारांच्या समस्यांविषयी माहिती देण्यासाठी महाराष्ट्र राज्य माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनचे सरचिटणीस नरेंद्र पाटील व कार्याध्यक्ष माजी मंत्री शशिकांत शिंदे यांनी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. माथाडींचे प्रश्न गंभीर होत चालले आहेत. माथाडी बोर्डांवर पूर्णवेळ अध्यक्ष नाहीत. कर्मचाऱ्यांची संख्या कमी आहे. वर्षानुवर्षे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. आकसबुद्धीने माथाडी हॉस्पिटलची चौकशी लावण्यात आली होती. त्या समितीचा निर्णय अद्याप आलेला नाही. सर्व प्रश्न सोडविण्यासाठी वारंवार पाठपुरावा करूनही काहीच होत नसल्याने आंदोलन करण्यात येणार असल्याचे पाटील यांनी सांगितले.

शशिकांत शिंदे यांनीही प्रशासकीय स्तरावर माथाडी कायदा संपविण्याचे षड्यंत्र सुरू असल्याचे स्पष्ट केले. कामगारांच्या अस्तित्वाला धक्का लागणार असेल तर आम्ही स्वस्थ बसणार नाही. कामगारांच्या हितासाठी आंदोलन करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
माथाडी संघटनेने १८ प्रमुख मागण्यांचे निवेदन शासनाला दिले आहे. हे सर्व प्रश्न तत्काळ सोडविण्यात यावेत. प्रश्न न सोडविल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशाराही दिला आहे. पत्रकार परिषदेच्या वेळी चंद्रकांत पाटील, पोपटराव देशमुख व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

कामगारांचे प्रलंबित प्रश्न पुढीलप्रमाणे
बोर्डातील एएसटीआय कंपनीच्या संगणक प्रणालीद्वारे देण्यात येणारी सेवा खंडित केल्याविषयी निर्णय व्हावा
माथाडी सल्लागार समितीची पुनर्रचना करणे, समितीवर युनियनच्या पदाधिकाऱ्यांची नेमणूक करणे
विविध माथाडी बोर्डांची पुनर्रचना करणे व युनियनच्या सदस्यसंख्येच्या प्रमाणात सदस्यांची नेमणूक करणे
माथाडी मंडळातील कार्यालयीन सेवेत माथाडी कामगारांच्या मुलांना प्राधान्य देणे
मंडळामध्ये अध्यक्ष व सचिवांच्या नेमणुका करणे
माथाडी पतसंस्थांमधून कर्जाचे हप्ते कपात न करण्याच्या निर्णय रद्द घेणे
कळंबोली स्टील मार्केटमध्ये सुविधा उपलब्ध करून देणे
फॅक्टरीमध्ये माथाडी कायदा व मंडळाच्या योजनेची अंमलबजावणी करणे
विविध रेल्वे यार्डांत माथाडी कामगारांसाठी सुविधा उपलब्ध करून देणे
माथाडी कायदा व मंडळाच्या योजनेतील त्रुटी दूर करणे
माथाडी हॉस्पिटलच्या चौकशीचे गुºहाळ थांबवून रुग्णालय सुरळीत सुरू करण्यास सहकार्य करावे
कोल्हापूर माथाडी मंडळातील कामगारांच्या प्रश्नांसंदर्भात निर्णय घेणे
पुणे येथील कामगारांचे प्रश्न सोडवणे
माथाडी कायद्यात पोलीस संरक्षणाची तरतूद करणे, गुंड प्रवृत्तीला आळा घालण्यासाठी समिती गठीत करणे
नाशिक येथील माथाडी बोर्डातील कामगारांच्या लेव्हीच्या प्रश्नाची सोडवणूक करणे
बाजार समितीच्या मापाडी व तोलणार कर्मचाºयांना बाजार समितीच्या सेवेत सामावून घेणे
वडाळा येथील माथाडी कामगारांच्या घरकुलातील अडचणी दूर करणे
नवी मुंबई परिसरात घरे उपलब्ध करून देणे व इतर प्रश्न सोडविणे

आरपारची लढाई
माथाडी कायद्याच्या व कामगारांच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. कामगारांचे प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी आरपारची लढाई सुरू करण्यात येत असल्याची माहिती संघटनेच्या पदाधिकाºयांनी दिली.

Web Title: Mathadi workers aggressive for pending queries

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.