माथाडी कामगारांचा बनियान मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2018 12:30 AM2018-12-13T00:30:25+5:302018-12-13T00:30:35+5:30
माथाडी कामगारांचे प्रलंबित प्रश्न सोडविण्याच्या मागणीसाठी वाशीत बनियान मोर्चा काढण्यात आला.
नवी मुंबई : माथाडी कामगारांचे प्रलंबित प्रश्न सोडविण्याच्या मागणीसाठी वाशीत बनियान मोर्चा काढण्यात आला. त्यामध्ये राज्याच्या विविध भागांतील माथाडी तसेच वारणार कामगारांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता. या वेळी माथाडी सल्लागार समितीवर कामगारांच्याही प्रतिनिधीला घेण्याची मागणी करत शर्ट काढून आंदोलन केले.
माथाडी कायदा व कामगार चळवळ मोडीत काढण्याचा सुरू असलेला प्रयत्न व माथाडी कामगारांच्या विरोधात होत असलेल्या कृतीविरोधात बुधवारी वाशीत आंदोलन करण्यात आले. महाराष्टÑ माथाडी संघटना कृती समितीच्या वतीने स्वातंत्र्यसेनानी हुतात्मा बाबू गेनू यांच्या स्मृतिदिनी या मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.
माथाडी नेते तसेच अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत हे आंदोलन झाले. या आंदोलनास नाशिक, पुणे, सातारा, कोल्हापूर, अहमदनगर, लातूर तसेच राज्याच्या विविध भागांतून माथाडी, वारणार, मापाडी तसेच सुरक्षारक्षक कामगारांनी उपस्थिती दर्शवली होती. या वेळी राज्याचे कामगार मंत्री, कामगार विभागाचे प्रधान सचिव व पणन विभागाचा निषेध करण्यात आला. त्याकरिता कामगारांनी शर्ट व बनियान काढून माथाडी कामगारांवर होत असलेल्या अन्यायाचा निषेध केला.
याप्रसंगी माथाडी नेते गुलाबराव जगताप, चंद्रकांत शेवाळे, बळवंतराव पवार, पोपटराव पाटील, सतीशराव जाधव आदी उपस्थित होते. महाराष्टÑ माथाडी संघटना कृती समितीतर्फे दोन वर्षांपासून कामगारांच्या समस्या सोडविण्यासाठी सातत्याने आंदोलने होत आहेत. परंतु सरकारकडून माथाडी कामगारांना न्याय देण्यात उदासीनता दाखवली जात असल्याचीही खंत व्यक्त करण्यात आली.
या वेळी दोन तास ठिय्या मांडून मूक आंदोलन केल्यानंतर मागण्यांचे निवेदन पोलिसांना देण्यात आले. परंतु माथाडी कामगारांच्या मागण्या मान्य होईपर्यंत यापुढेही अशा प्रकारची तीव्र आंदोलने केली जाणार असल्याचे माथाडी नेते नरेंद्र पाटील यांनी सांगितले.