नामदेव मोरे, नवी मुंबई : सातारा लोकसभा मतदार संघावर महाराष्ट्र राज्य माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनने दावा केला आहे. कामगारांच्या येथील एपीएमसी मार्केटमध्ये गुरूवारी झालेल्या बैठकीत या मतदार संघातून संघटनेचे सरचिटणीस नरेंद्र पाटील यांना उमेदवारी द्यावी, असा निर्णय घेतला आहे. याविषयी भारतीय जनता पक्षाकडे मागणी केली जाणार आहे.
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीजवळील माथाडी भवनमध्ये संघटनेचे मुकादम, उपमुकादम व पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. सातारा लोकसभा मतदार संघातील सातारा, जावळी, पाटण, कोरेगाव, कऱ्हाड तालुक्यांमध्ये माथाडी कामगारांची संख्या मोठी आहे. या मतदार संघातून २०१९ मध्ये संघटनेचे सरचिटणीस नरेंद्र पाटील यांना युतीने शिवसेनेच्या तिकिटावर उमेदवारी दिली होती. त्यांना ४ लाख ५२ हजार ४९८ मते मिळाली होती. त्यामुळे यावेळी भारतीय जनता पक्षाने माथाडी कामगार संघटनेला पुन्हा त्या मतदार संघातून उमेदवारी द्यावी, अशी मागणी या बैठकीत करण्यात आली.
या बैठकीला संघटनेचे संयुक्त सरचिटणीस चंद्रकांत पाटील, रविकांत पाटील, दिलीप खोंड, अध्यक्ष एकनाथ जाधव, पोपटराव देशमुख यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.