नवी मुंबई: प्रलंबित मागण्यांसाठी माथाडी कामगारांनी १ फेब्रुवारी २०२३ रोजी संप पुकारला आहे. यामुळे मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पाचही बाजारपेठा बुधवारी बंद राहणार आहेत. परिणामी, मंगळवारी भाजीपाल्याच्या ५०० ते ६०० गाड्या आवक होऊनही भाज्यांच्या दरात २० ते ३० टक्के वाढ झालेली दिसली. प्रामुख्याने हॉटेल व्यावसायिकांकडून मागणी वाढल्याने भेंडी, गवार, हिरवी मिरची, वाटाणा, वांगी, फ्लॉवर या भाज्यांच्या दरात वाढ झाली आहे.
मंगळवारी बाजारात भेंडी ११४४ क्विंटल, फ्लॉवर ३२८९, गवार १९२ क्विंटल, टोमॅटो १४८१ क्विंटल, हिरवा वाटाणा ३३५० क्विंटल, हिरवी मिरची ३४०८ क्विंटल आणि वांगी २८३ क्विंटल आवक झाली आहे.
पाचही बाजारपेठा राहणार बंदया संपामध्ये माथाडी कामगारांसह बाजार समितीतील व्यापारी, तसेच इतर बाजार घटक सहभागी होणार आहेत. कांदा- बटाटा, भाजीपाला, फळ मार्केट, दाणा बंदर १ व २, साखर, मसाला, अशा सर्व बाजारपेठा बुधवारी बंद राहणार आहेत.
भाज्यांचे मंगळवारी वाढले दर
- भाजी- आधीचे दर - मंगळवारी
- भेंडी- ५४ ते ५६ - ६० ते ६५
- फ्लॉवर- १६ ते १८ - २४ ते ३६
- वाटाणा - १२ ते २० - ३०
- गवार - ६५ ते ६५ - ७०
- हिरवी मिरची- ३४ ते ३६ - ४० ते ४४
नव्या पिकामुळे कांदा दरात घसरणनवीन कांदा बाजार समितीस येऊ लागल्याने त्याच्या दरात घसरण सुरू झाली आहे. त्यामुळे एपीएमसी बाजारातही मंगळवारी कांदा किमान प्रतिकिलो ८ ते १४ रुपयांनी विकला गेला.