नवी मुंबई : पिंपरी चिंचवड येथील टाटा मोटार्स लिमिटेड कंपनीमधील व राज्यातील माथाडी कामगारांचे अनेक प्रश्न प्रलंबीत आहेत. या प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी १२ फेब्रुवारीपासून कामगार आझाद मैदानामध्ये उपोषण करणार आहेत.
टाटा मोटार्समधील टोळी क्रमांक ४९५ मधील कामगारांची मजूरी लेव्हीसह पिंपरी चिंचवड माथाडी मंडळात मालकाच्या माध्यमातून थेट जमा व्हावी. मजूरीच्या रकमेचा होत असलेला अपहार थांबविण्यात यावा. कंपनी व कॉन्ट्रॅक्टर मुळ मालक म्हणून मंडळात नोंदीत व्हावे. याच बरोबर कोल्हापूर बोर्ड, ग्रोसरी, भाजीपाला व रेल्वे बोर्डातील कामगारांच्या विविध मागण्या राज्य शासनाकडे प्रलंबीत आहेत. या मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी माथाडी नेते नरेंद्र पाटील यांच्या नेतृत्वाखाली कामगार सोमवारपासून आझाद मैदानावर उपोषण करणार आहेत. कामगार मंत्री, कामगार आयुक्तांकडे पाठपुरावा करूनही प्रश्न सुटत नसल्यामुळे आंदोलनाचा निर्णय घेण्यात आला आहे.