माथाडी कामगार आज संपावर
By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2020 03:48 AM2020-02-26T03:48:03+5:302020-02-26T03:48:11+5:30
मुंबई बाजार समितीसह विविध जिल्ह्यांमधील संघटनेचे कामगार सहभागी होणार
नवी मुंबई : वर्षानुवर्षे प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी महाराष्ट्र राज्य माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनने २६ फेब्रुवारीला राज्यव्यापी बंदचे आयोजन केले आहे. यामध्ये मुंबई बाजार समितीसह विविध जिल्ह्यांमधील संघटनेचे कामगार सहभागी होणार आहेत.
माथाडी कामगारांचे १८ प्रमुख प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित आहेत. माथाडी बोर्डाची पुनर्रचना, बोर्डामधील कर्मचारी भरती, पुणे व नाशिकमधील कामगारांचे प्रश्न, वडाळामधील घरे व इतर प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी एक दिवसाचे आंदोलन करण्यात येणार आहे. यामध्ये महाराष्ट्र राज्य माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनमध्ये असणारे कामगार सहभागी होणार आहेत. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती, रेल्वे धक्के, पुणे, नाशिक, सातारा, कोल्हापूर व इतर ठिकाणीही हा बंद करण्यात येणार असल्याची माहिती संघटनेचे सरचिटणीस नरेंद्र पाटील यांनी दिली आहे. मुंबई बाजार समितीमधील सर्व व्यवहार बुधवारी बंद राहणार आहेत.