मतदानासाठी माथाडी कामगार गेले गावाला, बाजार समितीमध्ये शुकशुकाट
By नामदेव मोरे | Published: May 7, 2024 07:48 PM2024-05-07T19:48:53+5:302024-05-07T19:49:10+5:30
सातारसह बारामती निवडणुकीत महत्त्वाची भूमिका
नवी मुंबई : सातारासह बारामती मतदारसंघातील माथाडी कामगार मतदानासाठी गावी गेल्यामुळे मंगळवारी बाजार समितीमध्ये शुकशुकाट पाहावयास मिळाला. कांदा, बटाटा, मसाला, धान्य मार्केटमधील व्यवहार थंडावले होते. कामगार कमी असल्यामुळे अनेक मार्केटमध्ये आलेला माल खाली केला नव्हता. तसेच जावकही कमी झाली.
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील व्यापारी व माथाडी कामगारांना राजकीय दृष्ट्याही महत्त्व प्राप्त झाले आहे. येथील पाच मार्केटमध्ये कामगार, व्यापारी, वाहतूकदार, व्यापाऱ्यांकडील मदतनीस अशा एकूण १ लाख नागरिकांना प्रत्यक्ष रोजगार प्राप्त झाला आहे. याशिवाय बाजार समितीबाहेर रेल्वे धक्के, लोखंड बाजार, जेएनपीटी व इतर कारखान्यांमध्येही माथाडी कामगारांची संख्या महत्त्वाची आहे. सातारा लोकसभा मतदारसंघातील सातारा, जावळी, वाई, पाटण, कोरेगाव तालुक्यांमध्ये माथाडी कामगारांची संख्या मोठी आहे. बारामती लोकसभा मतदारसंघात भोर तालुक्यात कामगारांची संख्या लक्षणीय आहे. या दोन्ही मतदारसंघात अटीतटीची लढत असल्यामुळे माथाडी कामगारांच्या मतांना महत्त्व प्राप्त झाले आहे.
गावाकडील मतदारयादीमध्ये नाव असलेले सर्व कामगार कुटुंबीयांसह मतदानासाठी गावी गेले आहेत. यामुळे बाजार समितीमधील कांदा-बटाटा, धान्य व मसाला मार्केटमधील व्यवहारांवर परिणाम झाला आहे. या मार्केटमध्ये शुकशुकाट झाला आहे. भाजीपाला मार्केटमधील कामगारांनी सकाळी काम करून गावाकडे जाणे पसंत केले आहे. भाजीपाला मार्केटमधील व्यवहार सुरळीत होते. फळ मार्केटमध्येही माथाडी गावी गेल्यामुळे हंगामी कामगारांकडून कामे करून घ्यावी लागली.
अनेक दुकाने बंद
माथाडी कामगार नसल्यामुळे तीन मार्केटमध्ये शुकशुकाट होता. अनेक गोडावूनही बंद ठेवली होती. मार्केटमध्ये आलेला माली गाडीतून खाली करण्यासाठीही कर्मचारी मिळत नव्हते. बाजारपेठेमधील वाहतूकही मंदावली होती. ८० टक्के व्यवहारावर परिणाम झाला होता.
कामगारांची मते कोणाला
माथाडी कामगार नेते शशिकांत शिंदे सातारा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. यामुळे त्यांनी कामगारांनी महाविकास आघाडीच्या मागे कामगारांनी उभे राहावे असे आवाहन केले आहे. माथाडी संघटनेचे सरचिटणीस नरेंद्र पाटील महायुतीमध्ये असल्यामुळे त्यांनी सातारा व बारामती मतदारसंघात महायुतीच्या उमेदवारांना पाठिंबा दिला आहे. दोन्ही नेते दोन पक्षात असल्यामुळे आता कामगारांची मते कोणाकडे जाणार याविषयी मार्केटमध्ये चर्चा सुरू झाली आहे.
दोन दिवसातील मार्केटमधील वाहनांचा तपशील
मार्केट - ६ मे- ७ मे
मसाला - २३२ - ५७
धान्य - ३०३ - १४०
कांदा - २६४ - ४७
फळ ८७९ - ५०४
भाजी - ५६७ - ५५६