नवी मुंबई : राज्यातील सर्व माथाडी संघटनांनी आंदोलनाचा इशारा दिल्याने शासन हादरले असून सर्व प्रमुख मागण्या मान्य केल्या आहेत. वादग्रस्त अध्यादेश रद्द करण्यात आला आहे. यामुळे २७ मार्चला माथाडी कामगारांच्या मोर्चाचे विजयी मेळाव्यात रूपांतर होणार असून कामगार मंत्री मान्य केलेल्या मागण्यांविषयीची घोषणा करणार आहेत.माथाडी व सुरक्षा रक्षक कामगार बचाव कृती समितीने सरकारविरोधात आंदोलनाचा इशारा दिला आहे. शासनाने माथाडी कायदा व मंडळांचे अस्तित्व संपविण्याचे षडयंत्र रचले आहे. १० फेब्रुवारी २०१६, ६ सप्टेंबर २०१६ व १७ जानेवारी २०१८ ला तीन शासन आदेश काढले आहेत. या आदेशामुळे कामगारांचे अस्तित्व संपण्याची शक्यता निर्माण झाली असल्यामुळे राज्यातील ४० कामगार संघटना एकत्र येवून २७ मार्चला भव्य मोर्चा काढण्याचा इशारा देण्यात आला. यासाठी नेमलेल्या कृती समितीचे नेतृत्व बाबा आढाव, नरेंद्र पाटील, शशिकांत शिंदे, गुलाबराव जगताप, अविनाश रामिष्टे, बळवंतराव पवार, पोपटराव पवार करणार आहेत. एक लाखपेक्षा जास्त कामगार आंदोलनामध्ये सहभागी करण्यासाठी संघटनांनी तयारी केली होती. आंदोलनाच्या इशाºयानंतर सरकार हादरले असून सर्व प्रमुख मागण्या मान्य करण्याचे आश्वासन दिले आहे. १७ जानेवारीला काढलेला वादग्रस्त अध्यादेश विनाअट मागे घेण्यात येणार आहे. यापूर्वीच्या दोन आदेशांमधील माथाडी कायदा व कामगारांसाठी त्रासदायक असणाºया तरतुदी वगळण्यात येणार आहेत. सुरक्षा रक्षकांचेही अनेक प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिले आहे.माथाडी कामगार मंगळवारी मस्जीद बंदर येथे एकत्र होणार आहेत. मुंबई कृषी उत्पन्न बाजारसमितीमधील कामगार कांदा बटाटा मार्केटमध्ये एकत्रित जमणार आहेत. तेथून मोर्चाने सानपाडा रेल्वे स्टेशनवरून मस्जीद बंदरपर्यंत जाणार आहेत. या मोर्चामध्ये हजारो कामगार जमणार आहेत. मस्जीदबंदरमध्ये मोर्चाचे विजयी मेळाव्यात रूपांतर होणार आहे. शासनाने कोणत्या मागण्या मान्य केल्याची माहिती दिली जाणार आहे. स्वत: कामगार मंत्री मोर्चाला सामोेरे होवून वादग्रस्त अध्यादेश रद्द केल्याचा व इतर प्रश्न सोडविण्याविषयी आश्वासन देणार आहेत.
माथाडींच्या इशाऱ्याने हादरले शासन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2018 1:28 AM