लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : नवी मुंबईतील मॅफ्को मार्केटसह परिसरातील शीतगृहाच्या चालकांनी अनधिकृतपणे फळांचा साठा करण्याबरोबरच आपल्या परिसरात अनधिकृत व्यापार करणे सुरू केले आहे. शीतगृहांचे हे कृत्य बेकायदेशीर असल्याचे सांगून माथाडी कामगारांनी याविरोधात शनिवारी आमदार शशिकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढला. शीतगृहांनी हा अनधिकृत व्यापार थांबविला नाही, तर तीव्र आंदोलनाचा इशारा शिंदे यांनी दिला.
मुंबईतून एपीएमसी मार्केट नवी मुंबईत आणले, तेव्हा सर्व व्यापार हा वाशीच्या एपीएमसी मार्केटमधून होईल, असे आश्वासन सरकारने दिले होते. मात्र, आता नव्या कायद्याचा आधार घेऊन शीतगृहचालक आयात केलेल्या फळांचा साठा करण्याबरोबरच शीतगृहातून थेट फळांचा व्यापार करत आहेत. यामुळे एपीएमसीतील व्यापारी आणि त्याच्यावर अवलंबून असणारे कामगार व दलालांचे मोठे नुकसान होत आहे. हा प्रकार असाच सुरू राहिला तर हे सर्व घटक रस्त्यावर येतील, असा दावा आमदार शशिकांत शिंदे यांनी केला. त्याला विरोध करण्यासाठीच शुक्रवारचा हा माेर्चा काढल्याचे ते म्हणाले.
...तर शीतगृहांना टाळे ठाेकूशीतगृहचालकांनी अनधिकृतपणे सुरू असलेल्या फळांचा व्यापार न थांबवल्यास त्यांच्या आस्थापनांना टाळे ठोकण्यात येईल, होणाऱ्या परिणामांना सरकार जबाबदार असेल, असा इशारा यावेळी शिंदे यांनी दिला.