सरकारविरोधात माथाडींचे रणशिंग, २७ मार्चला महामोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2018 03:31 AM2018-03-24T03:31:53+5:302018-03-24T03:31:53+5:30
माथाडी कायद्यामध्ये बदल करण्याचे षड्यंत्र सरकार करत आहे. कायदा व बोर्डाचे अस्तित्व धोक्यात आले असून सरकारच्या धोरणांविरोधात २७ मार्चला मंत्रालयावर महामोर्चा काढण्यात येणार आहे. सरकारला कामगारांची ताकद दाखवून देण्याची वेळ आली असून, मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा माथाडी नेत्यांनी दिला आहे.
नवी मुंबई : माथाडी कायद्यामध्ये बदल करण्याचे षड्यंत्र सरकार करत आहे. कायदा व बोर्डाचे अस्तित्व धोक्यात आले असून सरकारच्या धोरणांविरोधात २७ मार्चला मंत्रालयावर महामोर्चा काढण्यात येणार आहे. सरकारला कामगारांची ताकद दाखवून देण्याची वेळ आली असून, मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा माथाडी नेत्यांनी दिला आहे.
माथाडी कायद्याचे जनक अण्णासाहेब पाटील यांच्या ३६ व्या पुण्यतिथीनिमित्त मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कांदा मार्केटमध्ये मेळाव्याचे आयोजन केले होते. यावेळी सरकारविरोधातील आंदोलनाची घोषणा करण्यात आली. माथाडी नेते शशिकांत शिंदे यांनी सरकारच्या धोरणांवर टीका केली. सरकारने आतापर्यंत फक्त आश्वासनांची खैरात केली. प्रश्न सोडविण्याऐवजी कायद्याचे अस्तित्व नष्ट करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. सरकारने फेब्रुवारी २०१६, सप्टेंबर २०१६ व जानेवारी २०१८ मध्ये तीन अध्यादेश काढले आहेत. या अध्यादेशामुळे कामगारांचे अस्तित्व धोक्यात येणार आहे. तीनही अध्यादेश रद्द करण्यासाठी व इतर प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी २७ मार्चला सर्व संघटनांचा एकत्रित मोर्चा काढण्यात येणार आहे. राज्यातील सर्व संघटना मतभेद बाजूला करून कामगार हितासाठी एकत्र येणार आहेत. सरकारला माथाडींची ताकद दाखवून दिली जाईल. कायदा बदलण्याचे षड्यंत्र थांबवले नाही तर कामगार सरकार बदलतील असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. राज्यातील कामगारांचा आतापर्यंतचा सर्वात मोठा मोर्चा माथाडी संघटना काढणार आहे. कामगारांनी कुटुंबीयांसह मोर्चामध्ये सहभागी व्हावे. प्रश्न सुटेपर्यंत माघार घेतली जाणार नसल्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला.
माथाडी संघटनेचे सरचिटणीस नरेंद्र पाटील यांनीही सरकारच्या धोरणांवर टीका केली. कामगारांचे प्रश्न सुटावे यासाठी आम्ही तीन वर्षांपासून सरकारकडे पाठपुरावा करत आहे. कामगार मेळाव्याला मुख्यमंत्र्यांपासून महत्त्वाच्या मंत्र्यांना बोलावले. प्रश्न सोडविण्याची आश्वासने मिळाली पण प्रत्यक्षात कायद्यात बदल करून कामगारांच्या पोटावर मारण्याचे पाप केले जात आहे. अण्णासाहेब पाटील यांच्या नेतृत्वाखाली कामगारांनी रक्त सांडून निर्माण केलेला कायदा व बोर्डाचे अस्तित्व धोक्यात येवू लागले आहे. यामुळे सर्व संघटनांची बैठक घेवून महामोर्चाची तयारी केली आहे. माथाडी चळवळीला धक्का लावण्याचा प्रयत्न केल्यास सहन केला जाणार नाही. सरकारविरोधात तीव्र लढा दिला जाईल. आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला, गोळीबार, लाठीचार्ज केला तरी कामगार घाबरणार नाहीत. जोपर्यंत कामगारांचे प्रश्न सोडविले जाणार नाहीत तोपर्यंत लढा सुरूच राहणार असल्याचा इशारा यावेळी देण्यात आला. मेळाव्याला माथाडी संघटनेचे अध्यक्ष एकनाथ जाधव, गुलाबराव जगताप, वसंतराव पवार, चंद्रकांत पाटील, गुंगा पाटील, भारती पाटील, संगीता पाटील, शुभांगी पाटील, रविकांत पाटील, विक्रम भिलारे, सदाशिव सपकाळ, शारदा पाटील, आनंद पाटील व इतर मान्यवर उपस्थित होते.
भाकरी घेऊन या
सरकारविरोधात मंगळवारी महामोर्चा काढण्यात येणार आहे. मोर्चासाठी राज्यातून कामगार येणार आहेत. मुंबई व नवी मुंबई परिसरामधील कामगारांनी स्वत:बरोबर भाकरी घेवून याव्या. स्वत:साठी व राज्यातून येणाºया कामगारांसाठी जेवणाची व्यवस्था करावी. कोणत्याही स्थितीमध्ये मागण्या मान्य होईपर्यंत माघार घ्यायची नाही असा इशारा यावेळी देण्यात आला.
मेळाव्यामध्ये फक्त माथाडी नेते
माथाडी नेते अण्णासाहेब पाटील यांच्या जयंती व पुण्यतिथीला प्रत्येक वर्षी मुख्यमंत्री किंवा सरकारमधील वजनदार मंत्री उपस्थित असतात. राष्ट्रवादी काँगे्रसचे नेते शरद पवार, अजित पवार यांच्यासह अनेक नेते उपस्थित असतात. परंतु या मेळाव्याला सत्ताधारी व विरोधी पक्षातील कोणत्याच नेत्यांना बोलावण्यात आले नव्हते. माथाडी कामगार स्वबळावर हक्कासाठीचा लढा लढणार असून कामगारांमध्ये प्रसंगी सरकार बदलण्याची ताकद असल्याचे दाखवून दिले जाणार असल्याचा इशारा या माध्यमातून देण्यात आला.
माथाडी चळवळ मोडीत काढण्याचे षड्यंत्र सुरू आहे. कायदा व कामगारांचे अस्तित्व धोक्यात आहे. कामगारांनी रक्त सांडून निर्माण केलेला कायदा टिकविण्यासाठी तीव्र लढा दिला जाईल.
- नरेंद्र पाटील,
सरचिटणीस, माथाडी संघटना
माथाडी कामगार २७ मार्चला राज्यातील सर्वात मोठा मोर्चा काढणार आहेत. सरकारला कामगारांची ताकद दाखवून दिली जाणार असून प्रश्न सुटल्याशिवाय माघार घेतली जाणार नाही.
- शशिकांत शिंदे,
कार्याध्यक्ष माथाडी संघटना