माथेरानमध्ये पावसाची अचूक नोंद शक्य
By Admin | Published: June 22, 2017 12:26 AM2017-06-22T00:26:45+5:302017-06-22T00:26:45+5:30
एक दशकाहून अधिक काळ अडगळीत पडलेली हवामान खात्याची नोंद घेणारी यंत्रणा माथेरान नगरपरिषदेने बसविली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नेरळ : एक दशकाहून अधिक काळ अडगळीत पडलेली हवामान खात्याची नोंद घेणारी यंत्रणा माथेरान नगरपरिषदेने बसविली आहे. यामुळे माथेरानमध्ये पडणारा पाऊस, वाऱ्याचा वेग आणि तापमानाची अचूक नोंद घेणे आता शक्य होणार आहे.
माथेरानमध्ये पावसाचे प्रमाण अधिक आहे. आतापर्यंत माथेरान येथील शार्लोट लेक या तलावा जवळ महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून पारंपरिक पद्धतीने पावसाची नोंद घेतली जात असे आणि तीच जिल्हा प्रशासनाला पाठविण्यात येत होती. मात्र, आता माथेरान नगरपरिषदेने पाऊस आणि तापमानाची नोंद घेणारी आपली स्वतंत्र यंत्रणा कार्यान्वित केल्याने यापुढे माथेरानच्या पावसाचे अचूक मोजमाप होणार आहे. माथेरान येथील सर्वात उंच ठिकाण असलेल्या पेमास्टर गार्डन येथे ही यंत्रणा बसविण्यात आली आहे. याची जबाबदारी अन्सार महापुळे आणि विकास पार्टे या दोन कर्मचाऱ्यांवर देण्यात आली आहे. दिवसातून दोन वेळा सकाळी आणि संध्याकाळी पाऊस आणि तापमानाची नोंद घेऊन ती माहिती जिल्हा प्रशासनाबरोबर कुलाबा वेधशाळेकडे पाठविली जाते.
भारतात आज अनेक संस्था हवामानाचे अंदाज वर्तवतात. तरीही आयएमडी म्हणजे इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट ज्याला आपण वेधशाळा म्हणतो, हीच सरकारने मान्यता दिलेली एकमेव वेधशाळा आहे. गेल्या १३७ वर्षांपासून आयएमडीने आपल्यावरचा हा विश्वास टिकवून ठेवला आहे. सातत्याने बदल घडवून, नवनवीन यंत्रणा आणून अद्ययावत राहण्याचा प्रयत्न केला आहे. एवढेच नाही, तर वर्ल्ड मेट्रोलॉजिकल आॅर्गनायझेशन म्हणून कायम सदस्यत्व असणारी आणि दक्षिण मध्य आशियायी राष्ट्रांच्या हवामानाची जबाबदारी असणारी संघटना म्हणून आयएमडीचे वर्चस्व आहे. याच संस्थेचे मार्गदर्शनातून ही यंत्रणा उभारण्यात आली आहे. या उपक्र मामुळे नावीन्यपूर्ण उपक्र म राबविण्याची परंपरा माथेरान नगरपरिषदेने कायम ठेवली आहे.
दहा वर्षांपूर्वी माथेरान नगरपरिषदेने ही यंत्रणा खरेदी केली होती. अडगळीत पडलेली ही यंत्रणा उपयोगात आणून पदाधिकाऱ्यांनी विद्यार्थी, अभ्यासकांना माहितीचे दालन खुले केले आहे.