अजय कदम । लोकमत न्यूज नेटवर्कमाथेरान : माथेरान या पर्यटनस्थळी जाण्यासाठी असलेल्या नेरळ-माथेरान घाट रस्त्याचे काम वन विभागाच्या परवानगीअभावी रखडले होते. आॅक्टोबर २०१६ पासून बंद असलेल्या घाट रस्त्याच्या कामाला अखेर वन विभागाने परवानगी दिली आहे. त्यामुळे लवकरच कामाला सुरुवात होणार असून घाट रस्ता अधिक रुंद आणि प्रशस्त होणार नाही.नेरळ-माथेरान या ७ किलोमीटर अंतराच्या घाट रस्त्याचे मजबुतीकरण आणि रु ंदीकरणासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाकडून हस्तांतरित केला होता. एमएमआरडीएने सदर रस्त्याच्या नूतनीकरणासाठी २८ कोटींचा प्रस्ताव तयार केला होता. त्यात रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या वाहनांसाठी सुरक्षेकरिता संरक्षक कठडे, रस्त्याच्या दुतर्फा आरसीसी गटारे, जागा उपलब्ध असेल तेथे बगिचा आणि डांबरीकरण असे नियोजन होते. त्याचवेळी जागा उपलब्ध असेल तेथे दोन मार्गिकेची तयारी करणाऱ्या एमएमआरडीएने कामे सुरू करण्यापूर्वी अतिरिक्त जमिनीचा वन विभागाकडून ताबा मिळावा म्हणून परवानगी मिळविली नव्हती. त्यामुळे आॅक्टोबर २०१६ मध्ये वन विभागाने जुम्मापट्टी येथे रस्त्याचे काम बंद करण्याची सूचना एमएमआरडीएला दिली होती. वन विभागाकडून अतिरिक्त जमीन मिळविण्याचा प्रयत्न त्यानंतर प्राधिकरणाने केला, मात्र माथेरान हे पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील असल्याने वन विभागाने प्राधिकरणाचा प्रस्ताव रोखून ठेवला होता. मात्र मुंबई महानगर विकास प्राधिकरणाकडे असलेली रस्त्याची मंजुरी ही कायमस्वरूपी जागा ताब्यात मिळावी यासाठी असल्याने नवीन प्रस्ताव जानेवारी २०१७ मध्ये सादर करण्यात आला. त्यात नेरळ वन संरक्षक यांच्या हद्दीत ०.८६० हेक्टर आणि कर्जत वन संरक्षक हद्दीतील बेकरे गावाच्या हद्दीत येणारी ०.१९४ हेक्टर जमीन संपादित करण्याची परवानगी मागितली. या प्रस्तावावर वन विभागाच्या कायद्यानुसार अंमलबजावणी करताना अलिबाग उपवन संरक्षक कार्यालयाने नेरळ - माथेरान घाट रस्त्यातील अतिरिक्त जमिनीचा प्रस्ताव मान्य केला आहे. या परवानगीमुळे मुंबई महानगर विकास प्राधिकरणाला घाट रस्त्याचे काम करता येणार आहे.परंतु आता अस्तित्वात असलेल्या रस्त्यावरच दुतर्फा गटारे आणि रस्त्यावर डांबरीकरण करता येणार आहे. त्याचवेळी खोल दरीच्या बाजूला रस्त्यावर संरक्षक भिंती उभारताना देखील सार्वजनिक बांधकाम विभागाकडे असलेल्या रस्त्याच्या नकाशावरील उपलब्ध जमिनीवरच कामे करता येणार आहे.
माथेरान घाट रस्त्याच्या कामाला मंजुरी
By admin | Published: May 13, 2017 1:15 AM