लोकमत न्यूज नेटवर्कनेरळ : जोरदार पावसात नेरळ रेल्वेस्थानकात पाणीच पाणी झाले आहे. नेरळ स्थानकात पाण्याचा निचरा होण्याची योग्य व्यवस्था नसल्याने, नेरळ स्थानकातील माथेरान मिनीट्रेनचा प्लॅटफॉर्म पाण्याखाली आला आहे. नेरळ स्थानकातून बाहेर पडण्याचा हा मार्ग असल्याने नागरिकांना पाण्यातून ये-जा करावी लागत आहे. नेरळ स्थानकातील माथेरान प्लॅटफॉर्म समोर जुने झाड कोसळल्याने ते तोडण्याचे काम सुरू असून, झाडाचे खोड येथेच ठेवल्याने प्रवाशांचा मार्गही बंद झाला. पावसामुळे नेरळ स्थानकातील माथेरान प्लॅटफॉर्म पाण्याखाली आला आहे. या स्थानकात पाण्याचा निचरा होण्यासाठी रेल्वे प्रशासनाने कोणतीही व्यवस्था केली नसल्याने, दरवर्षी या स्थानकात मोठ्या प्रमाणात पाणी साचते आणि त्यामुळे प्रवाशांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. याकडे रेल्वे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने, प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. तरी रेल्वे प्रशासनाने या स्थानकात कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे. सतत कोसळणाऱ्या पावसामुळे ठिकठिकाणी पाणीच पाणी झाले असून, नदी-नाले तुडुंब भरून वाहत आहेत. तसेच नेरळ शहरातील रस्त्यावरही खड्डे पडले असून, मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. तसेच स्थानकातील मोठे पिंपळाचे झाड कोसळले होते. मात्र, ते उचलण्यास रेल्वे प्रशासनाने हयगय केल्याने प्रवाशांचा तिकीटघराकडे जाणारा पर्यायी मार्ग बंद झाला आहे.
नेरळमधील माथेरान मिनीट्रेनचा प्लॅटफॉर्म पाण्याखाली
By admin | Published: June 29, 2017 2:58 AM