माथेरानच्या रोपवेचे काम लवकरच लागणार मार्गी

By admin | Published: April 10, 2017 06:02 AM2017-04-10T06:02:59+5:302017-04-10T06:02:59+5:30

येथील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला महत्त्वाकांक्षी रोपवे प्रकल्प लवकरच मार्गी लागणार असल्याने

Matheran ropeway work will be started soon | माथेरानच्या रोपवेचे काम लवकरच लागणार मार्गी

माथेरानच्या रोपवेचे काम लवकरच लागणार मार्गी

Next

मुकुंद रांजणे / माथेरान
येथील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला महत्त्वाकांक्षी रोपवे प्रकल्प लवकरच मार्गी लागणार असल्याने पर्यटकांना ही पर्वणीच ठरणार आहे. त्यामुळे स्थानिकांच्या व्यवसायात भर पडण्याबरोबरच सर्वसामान्य मोलमजुरांना देखील आगामी काळ सुगीचा ठरणार आहे. यामुळे येथील स्थानिक नागरिकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
मागील काळात या अत्यावश्यक प्रकल्पात खोडा घालण्याचे काम काही संस्थांनी, तसेच तालुक्यातीलचकाही राजकीय मंडळींनी केले होते. मात्र, या सर्वच विरोधांना तिलांजली देत येथील सामाजिक, राजकीय मंडळींनी सातत्याने पाठपुरावा केल्यामुळे आता अल्पावधीतच रोपवेचे काम मार्गी लागणार असल्याने स्थानिकांसह पर्यटकांमध्ये एकूणच आनंदाचे वातावरण दिसत आहे. या प्रकल्पाची लांबी ३३०० मीटर इतकी असून, उंची ८५० मीटर इतकी असणार आहे. या प्रकल्पासाठी जवळपास दोनशे कोटी रु पये खर्च अपेक्षित आहे. त्यामुळे सदरचा रोपवे हा आशिया खंडातील सर्वात मोठा रोपवे ठरणार असल्याचे बोलले जात आहे.हा मार्ग कर्जत येथील भिवपुरी (डिकसळ) येथून माधवजी पॉइंटपर्यंत येणार आहे.
टाटा समूहांच्या माध्यमातून हे काम मार्गी लागणार असून, याबाबत मुंबई महानगर विकास प्राधिकरण हे यासाठी तांत्रिकदृष्ट्या सहकार्य करणार आहे. यासाठी मागील आठवड्यात एमएमआरडीएचे आयुक्त मदान व अतिरिक्त आयुक्त प्रवीण दराडे यांच्या कार्यालयात याविषयी महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. यामध्ये मुंबईच्या घाटकोपर - नवी मुंबईसह भिवपुरी - माथेरान रोपवे प्रकल्प पुढील तीन महिन्यांत मार्गी लागतील याची सविस्तर माहिती दिली.
माजी नगराध्यक्ष मनोज खेडकर यांच्या विनंतीवरून गेल्या वर्षी मुख्यमंत्र्यांचे सचिव प्रवीण दराडे यांनी रोपवेसंदर्भात टाटा कंपनीचे अधिकारी हर्षवर्धन गजभिये व कपूर यांच्यासोबत मंत्रालयात बैठक आयोजित केली होती. त्यावेळी सहा महिन्यांची मुदत मागितली होती. आता सर्व परवानग्या प्राप्त झाल्याने लवकरच कामाला सुरुवात होणार असल्याची टाटा कंपनीकडून सांगण्यात आले.

रायगड जिल्ह्यातील हा प्रथमच एवढा मोठा प्रकल्प उभा राहात असून माथेरानचे खरे वैभव पर्यटकांच्या दृष्टिक्षेपात येणार आहे. हा प्रवास करताना या माध्यमातून माथेरानच्या चतु:सीमेकडील पॉइंट्सची नयनरम्य दृश्ये न्याहाळता येतील, तसेच पर्यटकांची पैसा व वेळेची बचत होऊन पर्यटन व्यवसाय एकंदरीतच वृद्धिंगत होईल, असे जाणकारांचे मत आहे.

माथेरानकरांची प्रतीक्षा संपली
गेल्या वीस वर्षांपासून माथेरानकर प्रतीक्षेत होते. तो प्रकल्प आता मार्गी लागणार असल्याने एक उत्तम पर्यायी मार्गाची व्यवस्था या निमित्ताने होणार आहे.
केंद्र सरकारकडून परवानग्या येणे बाकी होते. आता सर्व परवानग्या प्राप्त झाल्याने लवकरच कामाला सुरु वात होणार असल्याची टाटा कंपनीकडून सांगण्यात आले. हा प्रकल्प पूर्ण होण्यास दीड वर्षाचा कालावधी लागणार असून पुढील तीन महिन्यांत कामाला खऱ्या अर्थाने सुरुवात होणार आहे.

रोपवेच्या माध्यमातून येथे वाहतुकीची एक पर्यायी व्यवस्था होणार आहे. त्यामुळे साहजिकच पर्यटकांच्या संख्येत लक्षणीय वाढ होऊन सर्वांचीच उत्पन्नाच्या बाबतीत प्रगती होईल. हा प्रकल्प मार्गी लागल्यावर प्रथमत: स्थानिक भूमिपुत्रांना यामध्ये कामावर समाविष्ट केल्यास बेरोजगार मुलांना रोजगार उपलब्ध होईल.
-प्रेरणा सावंत, नगराध्यक्षा, माथेरान नगरपरिषद

Web Title: Matheran ropeway work will be started soon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.