माथेरान : राष्ट्रीय हरित लवादाने १० जानेवारी रोजी माथेरानमधील अनधिकृत वाढीव बांधकामे काढून टाकण्यात यावीत याबाबत माथेरान नगरपरिषद आणि पोलीस प्रशासन यांना आदेश दिल्यानंतर बांधकामे हटवण्यासाठी संबंधित खात्याने हालचाली सुरू केल्या आहेत. त्यामुळे स्थानिकांमध्ये घबराटीचे आणि तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. तूर्तास बांधकामांवर कारवाई न करण्याबाबत जिल्हाधिकारी,अधीक्षक यांना निवेदन देण्यात आले आहे.हरित लवादाच्या आदेशानुसार कोणतेही नवीन बांधकाम होत असेल तर हटविण्यात यावे, असे म्हटले आहे. सध्या येथे कोणतेही नवीन बांधकाम सुरू नाही. हरित लवादाने कोणती बांधकामे काढावीत याबाबत तपशील दिलेला नाही. हे आदेश ही ‘ब्लँकेट आॅर्डर’ आहेत. त्यामुळे कारवाई करताना पक्षपात आणि अन्याय होण्याची भीती नाकारता येत नाही असे स्थानिकांचे म्हणणे आहे. ज्या नागरिकांच्या घरांवर कारवाई होणार आहे असे संकेत मिळत आहेत त्यांना त्यांचे म्हणणे मांडण्यासाठी कोणतीही संधी हरित लवादाने दिलेली नाही.त्यामुळे २१ फेब्रुवारीच्या सुनावणीत आम्ही स्थानिकांचे म्हणणे मांडणार आहोत. आमचे म्हणणे मांडल्यावर जो अंतिम आदेश आहे त्यानुसार प्रशासनाने कारवाई करावी तोपर्यंत तूर्तास बांधकामे पाडण्याची कारवाई करू नये असे स्थानिकांच्या वतीने नगराध्यक्षा प्रेरणा सावंत, उपनगराध्यक्ष आकाश चौधरी, नगरपरिषद गटनेते प्रसाद सावंत, शिवसेना शहरप्रमुख चंद्रकांत चौधरी आणि कॉँग्रेसचे शहर अध्यक्ष मनोज खेडकर यांनी सामोपचाराने निवेदन जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक रायगड यांना शनिवारी ४ फेब्रुवारी रोजी दिलेले आहे. त्यामुळे आगामी काळात काय घडामोडी या गावात घडतात याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. (वार्ताहर)
माथेरानकरांचे जिल्हाधिकारी, अधीक्षकांना साकडे
By admin | Published: February 06, 2017 4:52 AM