माथेरानकरांनी मांडले गाऱ्हाणे
By admin | Published: March 28, 2017 05:27 AM2017-03-28T05:27:04+5:302017-03-28T05:27:04+5:30
गुजरातच्या माजी मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल या २६ मार्चला रविवारी माथेरानला आल्या होत्या. त्या दस्तुरी नाका येथील
माथेरान : गुजरातच्या माजी मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल या २६ मार्चला रविवारी माथेरानला आल्या होत्या. त्या दस्तुरी नाका येथील टॅक्सी स्टॅण्डहून गावात येताना हातरिक्षात बसून आल्या. माणूस माणसाला ओढणाऱ्या या अमानवीय प्रथेबद्दल त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली, तसेच दगडमातीच्या खड्ड्यातील रस्त्यांबद्दल सुद्धा उपरोधिक टोला लगावला. गुजरातच्या आदिवासी पाड्यांमध्ये यापेक्षा उत्तम दर्जाचे रस्ते आहेत. देश आधुनिकतेच्या बाबतीत तंत्रज्ञानात अग्रेसर असताना येथे आजही मानवचलित हातरिक्षा पाहून आपण आजही ब्रिटिश राजवटीत असल्याचा आभास होत आहे. येथे केवळ ई-रिक्षा हाच एकमेव आणि सोयीस्कर उत्तम पर्याय ठरू शकत असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. याबाबतीत आपण स्वत: केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना शिफारस करणार असल्याचे सांगितले.
या वेळी भाजपाचे माथेरानचे शहर अध्यक्ष विलास पाटील, संजय भोसले, अरविंद शेलार यांनी अनिश्चित काळासाठी बंद करण्यात आलेल्या मिनीट्रेनसंदर्भात तसेच पर्यायी मार्ग म्हणून पनवेल-धोदाणी मार्गे माथेरान घाट रस्त्याबाबत आणि प्रामुख्याने वाहतुकीसाठी ई-रिक्षा सुरू व्हावी अशा आशयाचे निवेदन आनंदीबेन पटेल यांना दिले. या वेळी गुजराती समाजाचे दीपक शहा, इंद्रवर्धन शहा, जेसुभाई, मुकेश शहा, नितीन शहा, गिरीश चोथाणी आदींनी भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. यावर लवकर काहीतरी ठोस उपाययोजना करून येथील मूलभूत समस्या तडीस नेण्यासाठी निश्चितपणे प्रयत्न करू. त्यातच पहिल्यांदा येथील अमानवीय प्रथा असलेली हातरिक्षा बंद करून ई -रिक्षासाठी संबंधित खात्याशी तसेच मंत्र्यांशी संपर्क करणार असल्याचे त्यांनी सांगितले. (वार्ताहर)