माथेरान : माथेरान या थंड हवेच्या ठिकाणी सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानंतर २००३पासून नवीन बांधकामांना बंदी आहे. मात्र माथेरान विकास आराखडा मंजूर होत नसल्याने नंतरच्या काळात अनेक बांधकामे झाली असून त्यापैकी ३४ बांधकामे तोडण्याचे आदेश राष्ट्रीय हरित लवादाने दिले आहेत.त्याविरु द्ध माथेरानमध्ये जनक्षोभ उसळला असून ३० जानेवारी रोजी माथेरान बंद ठेवले जाणार आहे. नेरळ-माथेरान टॅक्सी संघटनेचा पाठिंबा असून टॅक्सी सेवा देखील बंद ठेवली जाणार आहे. माथेरान हे २००३ नंतर पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील क्षेत्र घोषित झाल्यानंतर येथे कुठल्याही बांधकामांस परवानगी नाकारली आहे. तसेच दर वीस वर्षांनी नियमांनुसार करावयाचा विकास आराखडाही अद्याप शासनाने तयार केलेला नाही. बांधकामांस परवानगी दिली जात नसल्याने स्थानिकांच्या लोकसंख्येत वाढ होत गेल्याने अनेकांनी आपापल्या जागेत बांधकामे केलेली आहेत. परंतु ही बांधकामे काढून टाकावी अशा आशयाच्या नोटिसा राष्ट्रीय हरित लवादाने काढल्यानंतर स्थानिकांना अनेक अडचणींवर मात करताना कटू प्रसंगांना सामोरे जावे लागणार आहे. चुका शासनाच्या आणि भोगाव्या लागत आहेत जनतेला ही सध्याची परिस्थिती आहे. माथेरानच्या विकासा बाबतीत ही पर्यावरणवादी मंडळी नेहमीच आडकाठी येत असून आजवर अनेक स्थानिक या त्रासातून कुठेतरी सुखी जीवन जगावे या उद्देशाने मुलाबाळांच्या उज्ज्वल भविष्यासाठी अन्य ठिकाणी स्थायिक झालेले आहेत. राज्यातील अनेक भागातील बांधकामे शासनाने कायम केलेली असताना माथेरानसारख्या दुर्गम अशा १६७० एकरांच्या भूभागावर वसलेल्या या ठिकाणी विकासकामे करण्यास नेहमीच मज्जाव असतो. यापुढे माथेरानकर गप्प बसणार नाहीत. आपल्या न्याय हक्कांवर जर गदा येत असेल तर नाइलाजाने वेळप्रसंगी कायदा व सुव्यवस्थेबद्दल कदापि न पाहता हा लढा कायमस्वरूपी चालूच ठेवणार आहोत. शासनाचे माथेरानकडे लक्ष वेधण्याच्या दृष्टीने सोमवारी लाक्षणिक बंदची हाक देण्यात आली आहे. (वार्ताहर)
माथेरानकरांची आज बंदची हाक
By admin | Published: January 30, 2017 2:13 AM