कांता हाबळे
नेरळ : नेरळ-माथेरान मिनीट्रेनचे प्रवासी डब्बे ८ मे, २०१६ रोजी नॅरोगेज रुळावरून घसरल्यानंतर रेल्वेने मिनीट्रेनची वाहतूक अनिश्चित काळासाठी बंद केली आहे. सहा महिने उलटूनही ही वाहतूक पुन्हा सुरू झालेली नाही. याबाबत रेल्वे प्रशासनाकडे विचारणा केली असता, मिनीट्रेन तोट्यात असल्याचे कारण देण्यात येत आहे. मात्र, दरवर्षी जवळपास अडीच लाख प्रवाशांची वाहतूक करणारी मिनीट्रेन तोट्यात कशी, असा प्रश्न स्थानिकांना पडला आहे. ही सेवा पुन्हा सुरू करण्याची मागणी जोर धरते आहे. गेल्या चार वर्षांत मिनीट्रेन आणि शटल सेवेतील प्रवाशांची संख्या अडीच-तीन लाखांवर पोहोचली आहे. नेरळ-माथेरान मार्गावरील प्रवासी वाहतूक यातून मिळालेले उत्पन्न दरवर्षी जवळपास सव्वादोन ते अडीच कोटींच्या घरात आहे. नेरळ-माथेरान या २० कि.मी.च्या घाटमार्गावर मिनीट्रेन चालवली जाते. १९०७ मध्ये ब्रिटिश राजवट असताना सुरू झालेली मिनीट्रेन जागतिक वारसासाठी प्रस्तावित आहे. जागोजागी वळणे, अरुंद मार्गाचा अभ्यास करण्यासाठी जगभरातून पर्यटक आणि अभ्यासक याठिकाणी नेहमीच येत असतात. मिनिट्रेन सुरू झाल्यापासून पावसाळ्यात ती बंद ठेवण्याचा पायंडा आजतागायत कायम आहे. २९ सप्टेंबर, २०१२मध्ये मिनीट्रेनची शटल सेवा सुरू केल्यानंतर पावसाळ्यात अमन लॉज -माथेरान या शटल सेवेला पर्यटक तसेच स्थानिक प्रवाशांचा उदंड प्रतिसाद मिळतो. माथेरानमधील विद्यार्थी, तसेच नोकरदार वर्ग, स्थानिकांनाही शटल सेवा सोयीची पडते. ९ मे २०१६ पासून हा मार्ग बंद करण्यात आला. मात्र, आता मार्ग तोट्यात असल्याचे कारण पुढे करण्यात येत आहे. पाच वर्षांचा विचार करता, मिनीट्रेनमधून दरवर्षी साधारण २ लाखांहून अधिक प्रवाशांनी प्रवास केला आहे. शिवाय या मार्गाची लोकप्रियता अफाट आहे. असे असताना आणि चांगले उत्पन्न असतानाही ही रेल्वे बंद ठेवण्यात कोणाचा, कसा व काय फायदा आहे? असा प्रश्न निर्माण होत आहे.