नवी मुंबई : मशिदीमध्ये झोपण्यावरून झालेल्या वादातून मौलानाच्या हत्येची घटना ऐरोलीत घडली होती. याप्रकरणी रबाळे पोलिसांनी कानपूर येथून एकाला अटक केली आहे. अटक केलेली व्यक्ती माथेफिरू असून यापूर्वीच्या त्याच्या काही कृत्यांमुळे त्याला इंडोनेशियामधूनही परत पाठवण्यात आल्याचे समजते.नबी अहमद अब्दुला शेख उर्फ गुलाम नबी (३२) असे अटक केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. तो मूळचा उत्तर प्रदेशचा राहणारा असून काही दिवसांपासून ऐरोलीत मजूर कामगार म्हणून राहायला होता. तो ज्यांच्याकडे कामाला होता, ते गावी जाणार असल्यामुळे त्यांनीच गुलाम याची रात्रीच्या झोपण्याची सोय लगतच्या मदुनतीळ उल्लम मस्जित व मदरसा या ठिकाणी केली होती. त्यानुसार ४ जानेवारीच्या मध्यरात्री गुलाम हा मस्जितमध्ये गेला होता. त्या वेळी मौलाना (बांगी) इश्तेयाक अहमद रोशनअली शेख व त्यांचे भाऊ इसहाक हे दोघे अगोदरच मस्जितमध्ये झोपलेले होते; परंतु गुलाम हा झोपेत जोरजोराने ओरडत असल्यामुळे त्यांना झोप लागत नव्हती. यामुळे दोघांनी बाहेर जाण्यास सांगितल्याने गुलाम हा त्यांच्यासोबत भांडू लागला. अखेर ज्यांनी त्याला झोपण्यासाठी पाठवले त्यांना संपूर्ण प्रकाराची माहिती देण्यासाठी इसहाक गेले होते. काही वेळाने ते परत आले असता आतमध्ये इश्तेयाक शेख (५५) हे मृत अवस्थेत पडल्याचे आढळून आले. शिवाय गुलाम नबी हाही त्या ठिकाणावरून पळालेला होता. उपआयुक्त प्रशांत खैरे, सहायक आयुक्त दिलीप माने, वरिष्ठ निरीक्षक प्रदीप तिदार यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक संतोष कोतवाल, उपनिरीक्षक अजय कुंभार यांच्या पथकाने या प्रकारणाचा तपास लावला. (प्रतिनिधी)
मौलानाची हत्या करणारा अटकेत
By admin | Published: January 10, 2017 6:55 AM