पनवेल : मावळ लोकसभा मतदार संघातून शिवसेना, भाजप, आरपीआय, रासप या महायुतीचा मावळा विजयी होऊन पुन्हा लोकसभेत जाईल, यात शंका नसल्याचे प्रतिपादन मावळचे विद्यमान खासदार व महायुतीचे उमदेवार श्रीरंग बारणे यांनी खारघर येथे आयोजित महायुतीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत केले.
सक्षम सरकार आणण्यासाठी, मतदारांनी मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन बारणे यांनी केले. गेल्या पाच वर्षांत पनवेल व उरण परिसरात मोठ्या प्रमाणात लोकसेवेची कामे करण्यात आली आहेत. काही कामे प्रगतिपथावर आहेत. पवार कुटुंबाचे लेबल सोडल्यास ‘त्या’ उमेदवाराकडे काहीही नसल्याचे पार्थ पवार यांना उद्देशून बारणे या वेळी बोलले. श्रीरंग बारणे सातत्याने जनतेच्या संपर्कात होते. त्यांनी मोठ्या प्रमाणात केंद्रातील योजना पनवेल व उरण परिसरात राबविल्या असल्याचे भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी सांगितले. या वेळी हजारो कोटींचा सिंचन घोटाळा करणाऱ्यांना संधी द्यायची का? असा प्रश्न त्यांनी उपस्थितांना विचारला.उरणचे आमदार मनोहर भोईर यांनी पनवेल, उरण व कर्जत खालापूर या ठिकाणाहून मोठ्या प्रमाणात उमेदवार श्रीरंग बारणे यांना मतदान होईल. ते एक लाखापेक्षा जास्त मतदानांचा लीड घेऊन विजयी होतील, असा विश्वास भोईर यांनी व्यक्त केला. पनवेल विधानसभा मतदार संघ मावळ लोकसभा मतदार संघात सर्वात मोठे विधानसभा क्षेत्र असल्याने, बारणे यांनी संपूर्ण दिवसभर पनवेल तालुक्यातील विविध भागात भेटी दिल्या. खारघरमध्ये पार पडलेल्या बैठकीत कार्यकर्त्यांना दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी मार्गदर्शन केले. या वेळी कोकण म्हाडाचे सभापती बाळासाहेब पाटील, उपमहापौर विक्र ांत पाटील, महापौर कविता चौतमोल, सेनेचे जिल्हाप्रमुख शिरीष घरत, बबन पाटील आदीसह भाजप, सेना आरपीआय युतीचे कार्यकर्ते उपस्थित होते.