सिडको वसाहतीमधील फ्लॅटधारकांवर मावेजाचे संकट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2019 11:40 PM2019-12-16T23:40:25+5:302019-12-16T23:40:27+5:30
कामे रखडली : वाढीव मोबदला मिळावा अशी मागणी
पनवेल : सिडको वसाहतीमधील फ्लॅटधारकांवर मावेजाचे संकट उभे राहिले आहे. परिणामी या भागातील रहिवाशांची सोसायटी स्थापने, कॉन्व्हेंस डिड, फायनल आॅर्डर, सिडको ट्रान्स्फर इत्यादी कामे रखडली आहेत. प्रकल्पग्रस्तांना दिल्या जाणाऱ्या साडेबारा टक्के विकसित भूखंडावर सिडको मावेजा आकारात असते.
मावेजा म्हणजे जागेचा वाढीव मोबदला जागेच्या मालकाला मिळावा अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. मात्र संबंधित जागेवर उभ्या राहिलेल्या ईमारती मधील फ्लॅटधारकांना या मावेजामुळे विविध अडचणींना सामोरे जावे लागत आहे. संबंधित मावेजा हा बांधकाम व्यावसायिकाने भरणे अपेक्षित असतो. मात्र इमारत उभी राहिल्यावर सीसी, ओसी मिळाल्यानंतर संबंधित बांधकाम व्यावसायिक सोसायटी स्थापनेसाठी बिल्डिंग मधील रहिवाशांवर आपली जबाबदारी देत असतो. अशावेळी बिल्डरच्या माध्यमातून मावेजा कर भरला गेला नसल्याने संबंधित फ्लॅटधारकांना सोसायटी स्थापन, डिम्ड कन्व्हेंटसाठी अडचण येते.
अनेकवेळा संबंधित शेतकºयांची त्या जागेच्या वाढीव मोबदल्याची केस न्यायालयात सुरु असल्यास तो अडथळा देखील फ्लॅटधारकांना येत असल्याने यासंदर्भात काढण्याची मागणी केली जात आहे. शेतकरी, बिल्डर आणि सिडको यांच्यातील वाद असून त्याचा त्रास रहिवाशांना सहन करावा लागत आहे, फ्लॅट घेतेवेळी संबंधित बिल्डरकडून कोणतीही माहिती फ्लॅटधारकांना देण्यात येत नसून अनेक बिल्डरांनी फसवणूक केल्याच्या घटना उघडकीस आल्याची माहिती पनवेल सिडको हौसिंग फेडरेशनचे अध्यक्ष कुंडलिक काटकर यांनी दिली.
यासंदर्भात १५ डिसेंबर रोजी करंजाडे येथे सभा आयोजित करण्यात आली होती. त्यात कुंडलिक काटकर यांनी या विषयवार फ्लॅटधारकांना मार्गदर्शन करीत मावेजाचा ज्वलंत प्रश्न सोडविण्याकरिता सिडको विरोधात लढा उभारण्यास सांगितले.
पत्रव्यवहार करूनही सिडकोकडून प्रतिसाद नाही
व्यवस्थापकीय संचालक यांना याप्रकरणी तीन वेळा पत्रव्यवहार करून देखील त्यांच्याकडून पत्राचे उत्तर देखील देण्यात आले नाही. सिडकोच्या उदासीन कारभारामुळे एक एक पैसे गोळा करून घर घेतलेल्या सर्वसामान्य फ्लॅटधारकांची हि पिळवणूक सुरु आहे. ती कुठे तरी थांबायची गरज असल्याचे मत पनवेल सिडको हौसिंग फेडरेशनचे अध्यक्ष काटकर यांनी व्यक्त केले.