- विशाल विकारी लोणावळा : मावळ लोकसभेच्या प्रचाराचा शेवटचा टप्पा सुरु झाला आहे. मावळ विधानसभा मतदार संघ हा सर्वसाधारण मतदार संघ आहे. या मतदार संघात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची सभा वगळता इतर कोणत्याही नेत्याची सभा झालेली नाही. महायुती व महाआघाडीच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी लोकांपर्यत पोहचत उमेदवारांचे जाहीरनामे पोहचविण्याचे काम केले आहे.मावळ मतदार संघ हा दुर्गम खेडी व वाड्या वस्त्यांनी बनलेला असला, तरी यामध्ये लोणावळा व तळेगाव नगरपरिषदा, वडगाव नगरपंचायत, देहूरोड कॅन्टोमेंट बोर्ड यांचादेखील समावेश आहे. राष्ट्रवादी पक्षातील अंतर्गत गटबाजी व पाडापाडीच्या राजकारणामुळे या मतदारसंघावर मागील २५ वर्षांपासून भाजपाने पकड कायम ठेवली आहे. या वेळी मात्र पवार यांच्या नातवाला लोकसभेची उमेदवारी मिळाल्याने येथील राष्ट्रवादीचे सर्व गट-तट एकत्र आले आहेत. त्यामुळे विधानसभेची रंगीत तालीम म्हणून आमदार बाळा भेगडे यांच्याविरोधात राष्ट्रवादीला मताधिक्य देण्यासाठी स्थानिक नेते सक्रिय आहेत.मावळ विधानसभा मतदार संघ हा मावळ लोकसभा मतदार संघातील मध्यवर्ती मतदार संघ आहे. बाळा भेगडे हे मागील दहा वर्षांपासून या मतदारसंघात आमदार आहेत. मागील पाच वर्षांत या मतदारसंघातील खासदार व आमदार यांचे फारसे पटले नाही. मात्र लोकसभेच्या पूर्वसंध्येला शिवसेना व भाजपामध्ये राज्य पातळीवर हिंदुत्वाच्या मुद्द्यावर युती झाल्याने दोन्ही लोकप्रतिनिधींनी एकमेकातील वाद बाजूला ठेवत नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्याकरिता प्रचार यंत्रणा राबविण्यावर जोर दिला आहे. या मतदारसंघात महायुतीच्या प्रचाराची धुरा भाजपानेच खांद्यावर घेतली असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. युतीचा घटक पक्ष असलेली रिपाइं व शिवसेनेचा नाराज गट अद्याप प्रचारात सक्रिय नाहीत. दुसरीकडे आघाडीचा घटक पक्ष असलेली काँग्रेस प्रचारात फार सक्रिय झालेली दिसत नाही.युती । प्लस पॉइंट काय आहेत?मावळ मतदार संघात भाजपाची ताकत असून, युतीची प्रचार यंत्रणा घरोघरी जात आहे. यामध्ये शिवसेना व रिपाइंचे नेतेदेखील सहभागी आहेत. मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी आरएसएसही सक्रिय आहे.युती । वीक पॉइंट काय आहेत?मावळ मतदारसंघातील प्रचाराची धुरा भाजपाकडे सोपविल्याने उमेदवाराने शिवसैनिकांवर अविश्वास दाखविला अशी कार्यकर्त्यांची भावना आहे. मावळातील काही शिवसैनिक हे प्रचारापासून आजही अलिप्त आहेत.आघाडी । प्लस पॉइंट काय आहेत?मावळ लोकसभेला पवार घराण्यातील उमेदवार असल्याने मावळातील सर्व गट अभी नही तो कभी नही या विचाराने सक्रिय झाले आहेत. या गटांना विभागवार प्रचाराची धुरा दिल्याने मताधिक्यासाठी भर देत आहेत.आघाडी । वीक पॉइंट काय आहेत?मावळ विधानसभा मतदार संघात ग्रामीण भागात राष्ट्रवादी सर्व गट-तट विसरुन प्रचार कामाला लागले असले तरी शहरी भागात प्रचार हा वर वर सुरु आहे. कॉँग्रेसदेखील प्रचारात सक्रिय होताना दिसत नाही.मागच्या निवडणुकीत़़़2014 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपाचे आमदार बाळा भेगडे ह्यांना 95 हजार 319 मते मिळाली होती तर राष्ट्रवादीचे माऊली दाभाडे यांना 67 हजार 318 मते मिळाली होती.मागच्या दोन लोकसभांमध्ये काय होता निकाल?2009मावळ लोकसभेत मावळ तालुक्यातून शिवसेनेचे उमेदवार गजानन बाबर यांना 71,196 तर आझम पानसरे यांना 56320 ऐवढी मते मिळाली होती. बसपाचे उमाकांत मिश्रा यांना 3551 मते मिळाली होती.2014 मावळ लोकसभेसाठी या मतदारसंघात शिवसेनेचे श्रीरंग बारणे यांना 89,417 तर शेकापचे उमेदवार लक्ष्मण जगताप यांना 48,036 एवढी मते मिळाली होती. राष्ट्रवादीचे राहुल नार्वेकर यांना 31,441 मते मिळाली.कोणाच्या सभायुती । महायुतीकरिता राज्यमंत्री विजय शिवतारे व गुलाबराव पाटील यांची सभा होणार आहे.आघाडी।राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ व रोहित पवार यांच्या सभा होणार आहेत.
मावळ लोकसभा : बाळा भेगडेंविरुद्ध राष्ट्रवादीचे गट-तट मताधिक्यासाठी एकत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2019 1:24 AM