नवी मुंबई : यापूर्वीच्या अनेक महापौरांनी सभागृहात विरोधकांना बोलूही दिले नाही, परंतु अडीच वर्षांमध्ये विद्यमान महापौर व उपमहापौरांनी लोकशाही मूल्यांची जपणूक करून सर्व विषयांवर सविस्तर चर्चा घडविली. तुकाराम मुंढे यांच्या कार्यकाळात सभागृहाची शहराची अस्मिता व लोकशाही मूल्यांची जपणूक करण्यासाठी महापौरांनी स्वत: लढा उभारला व यशस्वी करून दाखविला अशा शब्दात सर्वपक्षीय नगरसेवकांनी महापौर सुधाकर सोनावणे व उपमहापौर अविनाश लाड यांचे कौतुक केले.महापौर व उपमहापौर पदाचा कार्यकाळ संपत आला असल्याने महापालिका सभागृहात सभागृहनेते जयवंत सुतार यांनी अभिनंदनाचा ठराव मांडला होता. या विषयावर सर्वपक्षीय नगरसेवकांनी त्यांची मते मांडली. २५ वर्षामध्ये प्रथमच महापौर व उपमहापौरांच्या कामगिरीचे सत्ताधारी व विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी कौतुक केले. यापूर्वीच्या आयुक्तांच्या कार्यकाळात लोकप्रतिनिधींना योग्य वागणूक दिली जात नव्हती. लोकप्रतिनिधींच्या भावनांचा आदर केला जात नव्हता. आंबेडकर भवनसह अनेक प्रश्नांविषयी लोकभावना डावलण्यात आली. जेव्हा शहराचा व सभागृहाच्या अस्मितेचा प्रश्न निर्माण झाला तेव्हा महापौर सुधाकर सोनावणे यांनी लढा उभारला. शहराच्या हितासाठी स्वत: महापौरांनी लढा उभारल्याचे हे देशातील पहिले उदाहरण. प्रयत्नांची पराकाष्टा करून या लढाईमध्ये त्यांनी यशही मिळविले. या कामगिरीसाठी शहरवासी त्यांना कधीच विसरणार नाहीत अशा शब्दात नगरसेवकांनी त्यांचे कौतुक केले. यापूर्वी महापालिकेच्या सभागृहामध्ये विरोधकांचे प्रस्ताव अडविले जात होते. विरोधकांना बोलू दिले जात नव्हते. परंतु अडीच वर्षामध्ये प्रत्येकाला सर्व विषयांवर बोलू देण्यात आल्याचे मत व्यक्त केले. महापौरांचे अभिनंदन करताना राजकीय शेरेबाजीही करण्यात आली. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी योग्य मोकळीक दिली नाही. सभागृहात व पत्रकार परिषदेमध्ये चिठ्ठ्या पाठविल्या जात होत्या. काहींनी नारळाचे, कडू लिंबाचे व चिंचेच्या झाडाचे उदाहरणही दिले. महापौरांना अडीच वर्षामध्ये महापौर बंगल्यावर राहू दिले नसल्याबद्दल नाराजीही व्यक्त करण्यात आले. विरोधकांनी घेतलेले आक्षेप सभागृह नेत्यांसह इतर नगरसेवकांनी खोडून काढले.महापौर, उपमहापौरांना आमदारकीसाठी शुभेच्छामहापौर सुधाकर सोनावणे यांनी महापौर पदाचा कार्यकाळ यशस्वीपणे पूर्ण केला. आता त्यांनी आमदारकीसाठी प्रयत्न करावे अशा शुभेच्छा संजू वाडे यांनी दिल्या यानंतर अनेकांनी त्याला अनुमोदन दिले. कोणी भाजपाकडून तर कोणी शिवसेनेकडून खुली आॅफर देवून टाकली. शिवसेनेच्या नामदेव भगत यांनी मात्र वाडे यांना आमदारकी लढायची असून मतांचे विभागणी करण्यासाठी महापौर तुम्हाला झाडावर बसविले जात असल्याचे सांगितले. उपमहापौर अविनाश लाड यांनीही गावी जावून आमदार व्हावे अशा शुभेच्छा दिल्या. यामुळे महापौरांच्या पुढील वाटचालीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.सुधाकर सोनावणे हे चाणाक्ष, हुशार अनुभवी नेतृत्व आहे. त्यांनी शहरहिताचे काम केले. मुंढे यांच्या संघर्षासोबत एकत्र काम करण्याची संधी मिळाली.- संजू वाडे, प्रभाग १२महापालिकेमध्ये यापूर्वीच्या महापौरांकडून अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला घातला होता. तुम्ही सर्वांना बोलू दिले. यापूर्वीच्या आयुक्तांच्या झुंडशाहीविरोधात लढा देवून लोकशाही मूल्यांची जपणूक केली.- शिवराम पाटील, प्रभाग ४०महापौर हे आंबेडकरी चळवळीतील कृतीशील कार्यकर्ता व चांगले मित्र आहेत. शहराच्या विकासासाठी चांगले काम करून दाखविले.- निवृत्ती जगताप, प्रभाग २९अडीच वर्षांच्या कार्यकाळात महापौरांच्या नेतृत्व, कर्तृत्व व वक्तृत्वाचे नवीन पैलू अनुभवता आले. विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनाही सभागृहात व सभागृहाच्या बाहेरही त्यांनी सन्मानाची वागणूक दिली.- सरोजताई पाटील, प्रभाग १०१महापौरांनी आंबेडकर भवनसाठी दिलेला लढा सर्वांच्या लक्षात राहील. अडीच वर्षांमध्ये सभागृहात अनेक वेळा सदस्य आक्रमक झाले, परंतु त्यांनी कधीच तोल ढळू दिला नाही.- हेमांगी सोनावणे, प्रभाग-१७संघर्षातून यशाकडे प्रवास कसा करायचा ते सोनावणे यांच्या राजकीय व सामाजिक प्रवासाकडे पाहिले की लक्षात येते.- देविदास हांडे पाटील, प्रभाग ४२महासभेत यापूर्वी आम्ही हिटलरशाही अनुभवली आहे, परंतु या अडीच वर्षांत सर्वांना बोलायला मिळाले व लोकशाही मूल्ये जिवंत असल्याची जाणीव झाली.- सोमनाथ वास्कर, प्रभाग - ७४सात वर्षांपूर्वी विरोधी पक्षनेता असताना आम्हाला सभागृहात बोलू दिले जात नव्हते. रात्री अडीच वाजता आमच्यावर गुन्हे दाखल केले, परंतु या अडीच वर्षांत आम्हाला प्रथमच बोलण्याचे स्वातंत्र्य मिळाले.- मनोज हळदणकर,नगरसेवक शिवसेनासोनावणे यांनी बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारधारेची जपणूक केली आहे.- सुनील पाटील, प्रभाग ९२पूर्वीचे महापौर विरोधकांच्या वॉर्डात हस्तक्षेप करत होते. परंतु विद्यमान महापौरांनी त्यांच्या कार्यकाळात कोणाच्याही वॉर्डात हस्तक्षेप केला नाही.- रामचंद्र घरत, प्रभाग ६६प्रभागातील विकासाचे प्रत्येक काम मार्गी लावण्यासाठी महापौरांनी सहकार्य केले. विकास कामात पक्षपात केला नाही.- संगीता बोºहाडे,प्रभाग ७६महापौर व उपमहापौरांनी सर्वांना सोबत घेवून काम केले. पुढील अडीच वर्षे हे दोघेच या पदावर राहावेत.- अॅड. भारती पाटील,प्रभाग ४४वक्तृत्व, नेतृत्व व कर्तृत्व चांगलेच आहेच यापेक्षाही माणूस म्हणून महापौर चांगले आहेत.- उषा भोईर, प्रभाग ५६यापूर्वीच्या आयुक्तांच्या कार्यकाळात लोकशाहीला तडा जात असताना तुम्हाला लढताना सभागृहाने पाहिले असून तो लढा सर्वांच्या लक्षात राहील.- नेत्रा शिर्के, प्रभाग - ९१महापौरांनी सुडाचे राजकारण कधीच केले नाही.कोणावरही कधीच खोटे गुन्हे दाखल केले नाहीत.- किशोर पाटकर, प्रभाग ६१महापौर झाल्यानंतरही झोपडपट्टीमधील नागरिकांबरोबर राहणारे व सर्वसामान्यांसाठी तळमळीने बोलणारे नेतृत्व.- अशोक गुरखे,प्रभाग १०२लोकशाही मूल्यांची जपणूक करून शिक्षणासाठी चांगले काम केले.- नामदेव भगत,प्रभाग ९३स्मार्ट सिटीपासून स्वच्छता अभियानापर्यंत प्रत्येक ठिकाणी छाप पाडली.- डॉ. जयाजी नाथ, प्रभाग १०४महापौरांनी आयुक्तांविरोधात दिलेला लढा ऐतिहासिक ठरला.- अनंत सुतार,राष्ट्रवादीविरोधकांच्या भूमिकेचेही स्वागत करणारे महापौर.- द्वारकानाथ भोईर, प्रभाग ३०सीवूडमधील शाळेमध्ये ईटीसी केंद्र सुरू करण्याचा माजी आयुक्तांचा निर्णय महापौरांनी थांबविला व तेथे सीबीएसई बोर्डाची शाळा सुरू करण्याचा निर्णय घेवून नागरिकांना दिलासा दिला आहे.- विशाल डोळस,प्रभाग १०८अडीच वर्षामध्ये एक वर्ष शिकण्यामध्ये व दुसरे वर्ष तेव्हाच्या आयुक्तांमुळे वाया गेले. अडचणी असतानाही महापौरांनी अनेक कामे मार्गी लावली- रूपाली किस्मत भगत,प्रभाग ९६झोपडपट्टी परिसराच्या विकासाला नेहमीच प्राधान्य दिले.- बहादूर बिष्ट,प्रभाग ८आंबेडकर भवनचे उद्घाटन महापौरांच्या कार्यकाळातच झाले पाहिजे. त्यांना काम करण्याची पूर्ण मोकळीक दिली नाही.- एम. के. मढवी,प्रभाग - १८सभागृहात सर्वांना बोलू दिले व प्रत्येक विषयावर चांगली चर्चा घडवून आणली.- सुनीता मांडवे,प्रभाग ९७
महापौरांनी जपली शहराची अस्मिता, लोकशाही मूल्यांची जपणूक केल्याबद्दल मानले आभार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2017 2:33 AM