महापालिका आयुक्तांवर महापौरांची पुन्हा टीका
By admin | Published: January 2, 2017 06:27 AM2017-01-02T06:27:43+5:302017-01-02T06:27:43+5:30
महापालिकेचा २५ वा वर्धापन दिन रविवारी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी महापौर सुधाकर सोनावणे यांनी प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरीत्या आयुक्तांवर टीकेची संधी साधली.
नवी मुंबई : महापालिकेचा २५ वा वर्धापन दिन रविवारी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी महापौर सुधाकर सोनावणे यांनी प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरीत्या आयुक्तांवर टीकेची संधी साधली. मात्र केवळ माणसांनी केलेल्या चुकांना उजाळा देण्याचे काम आपण करत असून, त्या माणसांच्या विचारांमध्ये परिवर्तन होणे अपेक्षित असल्याचीही कोपरखळी त्यांनी मारली.
महापालिकेच्या वर्धापन दिनानिमित्ताने वाशीतील विष्णुदास भावे नाट्यगृहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या माध्यमातून महापालिकेच्या आजवरच्या घडामोडींना उजाळा देण्यात आला. यावेळी अनेकांचा विरोध असतानाही बांधण्यात आलेली मुख्यालयाची इमारत आज आयकॉन ठरत असल्याचा आनंद महापौर सुधाकर सोनावणे यांनी व्यक्त केला. महापालिकेला २५ वर्षांच्या इतिहासात लाभलेले अधिकारी व लोकप्रतिनिधी यांच्या योगदानामुळे अनेक महत्त्वपूर्ण प्रकल्प मार्गी लागल्याचीही भावना त्यांनी व्यक्त केली. मात्र नवीन आलेले अधिकारी त्याच अधिकाऱ्यांना रडारवर घेत आहेत. असे असतानाही अधिकाऱ्यांनी कायद्याच्या चौकटीत राहून शहराचा विकास केल्याचाही दावा महापौरांनी केला. सध्या प्रशासन व शासन यांच्यात कलगीतुरा सुरू आहे. त्यामुळे मागील दीड वर्षात आपल्याला खूप काही शिकायला मिळाल्याचेही त्यांनी सांगितले. माणसांनी केलेल्या चुकांना उजाळा देण्याचे काम आपण करत असून, यामधून त्या माणसांच्या विचारांमध्ये परिवर्तन होणे अपेक्षित असल्याची भावना व्यक्त करत त्यांनी मुंढे यांच्या बदली प्रकरणाला बगल दिली.
यावेळी उपस्थित आमदार मंदा म्हात्रे यांनीही पालिका अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कार्याचे कौतुक करत चांगल्या कामांमुळे पालिकेचा नावलौकिक होत असल्याचा आनंद व्यक्त केला. तसेच झोपडपट्टीधारकांना लवकरात लवकर पालिकेतर्फे ओळखपत्रे दिली जाण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली. यावेळी पालिका आयुक्तांनी कॅशलेस उपक्रमाप्रमाणेच फेसलेस नवी मुंबई करण्याचा मानस व्यक्त केला. या उपक्रमांतर्गत कोणत्याही कामासाठी पालिकेत जाण्याची गरज नसून, इंटरनेटच्या माध्यमातून घरबसल्या कामे करता येतील असे सांगितले. तर पुढील ५० वर्षांत हे शहर कसे असेल याचे मायक्रो लेव्हलचे नियोजन करणे गरजेचे असल्याचेही त्यांनी सांगितले.