महापौर भेटले नगरविकास सचिवांना

By Admin | Published: November 8, 2016 02:49 AM2016-11-08T02:49:14+5:302016-11-08T02:49:14+5:30

महापौर सुधाकर सोनावणे यांच्यासह लोकप्रतिनिधींच्या शिष्टमंडळाने नगरविकास विभागाच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर यांची भेट घेतली.

The mayor met Urban Development Secretaries | महापौर भेटले नगरविकास सचिवांना

महापौर भेटले नगरविकास सचिवांना

googlenewsNext

नवी मुंबई : महापौर सुधाकर सोनावणे यांच्यासह लोकप्रतिनिधींच्या शिष्टमंडळाने नगरविकास विभागाच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर यांची भेट घेतली. आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या कार्यपद्धतीविषयी तीव्र नाराजी व्यक्त करून अविश्वास ठरावामागील भूमिका विषद केली.
नवी मुंबई महापालिकेमधील कोंडी फोडण्यासाठी महापौर सुधाकर सोनावणे यांनी लोकशाही वाचवा अभियान सुरू केले आहे. आयुक्त तुकाराम मुंढे यांच्यावर अविश्वास ठराव दाखल झाल्यानंतर याविषयी वास्तवता पटवून देण्यासाठी यापूर्वी शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व आरपीआय नेते रामदास आठवले यांची भेट घेतली आहे. यानंतर आता राज्य शासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेवून त्यांना अविश्वास ठरावामागील वास्तव स्थितीची माहिती दिली जात आहे. आतापर्यंत स्वाधीन क्षत्रीय व मुकेश खुल्लर यांची भेट घेवून त्यांना माहिती दिली असून सोमवारी नगरविकास विभागाच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर यांची भेट घेतली. मुंढे यांच्याविषयी आम्हाला वैयक्तिक आकस नाही. त्यांच्या धडाडीच्या कार्यपद्धतीचे स्वागतच केले होते, पण सर्व लोकप्रतिनिधी व पालिकेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांकडे दूषित दृष्टिकोनातून पाहिले जात आहे. लोकप्रतिनिधींना भेटण्यासाठी वेळही दिली जात नाही. शहर वेठीस धरले जात असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
महापौरांसह सभागृह नेते जयवंत सुतार, द्वारकानाथ भोईर, शिवराम पाटील, शिवसेना उपनेते विजय नाहटा व इतर अनेक लोकप्रतिनिधी यावेळी उपस्थित होते. स्वातंत्र्यानंतर धरण विकत घेणारी नवी मुंबई एकमेव महापालिका आहे. शहरात चांगले रस्ते, मलनि:सारण प्रक्रिया केंद्र, पाणीपुरवठा व्यवस्था, चांगली उद्याने तयार करण्यात आली आहेत. पण महापालिकेने फक्त भ्रष्टाचार केल्याचा दिखावा निर्माण केला जात असल्याची खंत व्यक्त केली. (प्रतिनिधी)

Web Title: The mayor met Urban Development Secretaries

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.