चीनच्या महापौरांकडून नवी मुंबईचे कौतुक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2019 01:59 AM2019-12-25T01:59:45+5:302019-12-25T01:59:58+5:30
शहराचा घेतला आढावा : युवू शहर व नवी मुंबईत साम्य असल्याचा केला गौरव
नवी मुंबई : नवी मुंबई शहराच्या हद्दीत प्रवेश केल्यापासूनच त्याचे वेगळेपण नजरेला जाणवते, अशा शब्दात चीनमधील युवू शहराचे महापौर व्हॅँग जियान यांनी शहराचे कौतुक केले. स्मार्ट सिटी म्हणून नावलौकिक होत असलेल्या नवी मुंबईतील विकासकामांचे व विविध प्रकल्पांचे आकर्षण जगभरातील व्यक्तींमध्ये दिसून येत आहे. त्यानुसार शहरातील विदेशी नागरिकांच्याही संख्येत मोठी भर पडत आहे. तर महापालिकेमार्फत राबवलेल्या प्रकल्पांचा आढावा घेण्यासाठीदेखील विविध देशांतील शिष्टमंडळे येत असतात. त्यानुसार चीनच्या युवू शहराचे महापौर व्हँग जियान यांनीदेखील मंगळवारी नवी मुंबईला भेट दिली.
यावेळी पालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी सादरीकरणाद्वारे त्यांना पालिका क्षेत्राची, तसेच महानगरपालिकेच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या उल्लेखनीय कामांची व प्रकल्पांची माहिती दिली. यावेळी महापौर व्हँग जियान यांनीही युवू व नवी मुंबई या दोन शहरांमध्ये बरेचसे साम्य असल्याचे सांगत दोन्ही शहरांमध्ये मैत्रीपूर्ण संबंध निर्माण व्हावेत अशी अपेक्षा व्यक्त केली.
याप्रसंगी नवी मुंबईचे महापौर जयवंत सुतार यांनी शहरातील विविध सुविधांमधील वेगळेपण अधोेरेखीत केले. या भेटीदरम्यान जियान यांनी नवी मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालय इमारतीची व तेथील व्यवस्थेची प्रशंसादेखील केली. यावेळी यांग झोनघॉन्ग, लाऊ झीओडॉँन्ग यांच्यासह उपमहापौर मंदाकिनी म्हात्रे, सभागृह नेते रवींद्र इथापे, सभापती डॉ. जयाजी नाथ, उषा भोईर, श्रद्धा गवस, नगरसेवक विनोद म्हात्रे, सलुजा सुतार, अनिता मानवतकर, तसेच महानगरपालिका अधिकारी उपस्थित होते.