नवी मुंबईचे महापौरपद महिलांसाठी ‘खुले’
By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2019 01:42 AM2019-11-14T01:42:56+5:302019-11-14T01:43:06+5:30
नवी मुंबई शहराचे महापौरपद खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी आरक्षित झाले आहे.
कमलाकर कांबळे
नवी मुंबई : नवी मुंबई शहराचे महापौरपद खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी आरक्षित झाले आहे. त्यामुळे अनेकांचे महापौरपदाचेस्वप्न धुळीस मिळाले आहे. तर सहा महिन्यांनंतर होऊ घातलेल्या महापालिकेच्या निवडणुकीत नव्याने निवडून येणाऱ्या नगरसेविकांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. त्यानुसार राजकीय पक्षांतील नेत्यांनी आगामी महापौरपदाच्या दृष्टीने आपल्याच घरापासून चाचपणी सुरू केली आहे.
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर माजी मंत्री गणेश नाईक यांच्या भाजपप्रवेशानंतर शहरातील राजकीय गणिते बदलली आहेत. नाईक यांच्याबरोबर राष्ट्रवादीचे ५५ नगरसेवक भाजपात दाखल झाल्याने महापालिकेतील सत्ताधारी असलेल्या राष्ट्रवादीचे अस्तित्व संपुष्टात आले आहे. या धामधुमीत काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष दशरथ भगत यांच्यासह काँग्रेसचे काही नगरसेवक व पदाधिकारीही भाजपात दाखल झाले आहेत. त्यामुळे सहा महिन्यांनी येऊ घातलेल्या महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजप आणि शिवसेना या दोन पक्षांत महापौर पदासाठी खºया अर्थाने चुरस पाहायला मिळणार आहे. सध्या महापालिकेत १११ नगरसेवक आहेत. यात ५८ नगसेविका आहेत. विशेष म्हणजे, ५० टक्के आरक्षणानुसार ५६ महिला नगरसेविका म्हणून निवडून आल्या आहेत. तर दोन महिला खुल्या प्रवर्गातून निवडून आल्या आहेत. त्यामुळे महापालिकेत नगरसेविकांची संख्या ५८ इतकी झाली आहे. प्रभाग महिलांसाठी आरक्षित झाल्याने अनेक नगरसेविकांनी पत्नी, भावजय किंवा आपल्या मुलीला नगरसेविका म्हणून सभागृहात पाठविले आहे. आता नवी मुंबईचे महापौरपद खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी आरक्षित झाल्याने मागील अनेक वर्षांपासून महापौरपदाची आस बाळगून असलेल्या आजी-माजी नगरसेवकांची निराशा झाली आहे. असे असले तरी आगामी महापौरपदाच्या पार्श्वभूमीवर खुल्या प्रवर्गातील प्रमुख पक्षांच्या आजी-माजी नगरसेवक व पदाधिकाऱ्यांनी मोर्चेबांधणीच्या दृष्टीने हालचाली सुरू केल्या आहेत.
>भाजपची लागणार कसोटी
नवी मुंबईत गणेश नाईक आणि मंदा म्हात्रे हे भाजपचे दोन आमदार आहेत. या दोन्ही आमदारांतील सख्य सर्वश्रुत आहे. राष्ट्रवादीत असताना एकहाती निर्णय घेणारे गणेश नाईक यांना भाजपात ते स्वातंत्र्य मिळण्याची शक्यता धुसर आहे. त्यामुळे महापालिकेच्या आगामी निवडणुकीत उमेदवारांच्या निवडीतच भाजपची कसोटी लागणार आहे.
>शिवसेनेतील सुंदोपसुंदी
नवी मुंबईतील शिवसेनेला गटातटाने पोखरले आहे. उपनेते विजय नाहटा आणि महापालिकेतील विरोधी पक्षनेते विजय चौगुले यांच्यातील सुप्त संघर्षाचा फटका सर्वसामान्य शिवसैनिकांना बसताना दिसत आहे. राज्यातील सध्याचे चित्र पाहता सत्ता नक्की कोणाची येईल, याबाबत भाष्य करणे धाडसाचे ठरणारे आहे.
>२५ वर्षांतील
महिला महापौर
सुषमा दंडे
(शिवसेना) : १९९६
विजया म्हात्रे
(राष्ट्रवादी): १९८८
मनीषा भोईर
(राष्ट्रवादी): २००५
अंजनी भोईर
(राष्ट्रवादी): २००७