पनवेलचा महापौर १० जुलैला ठरणार!
By admin | Published: July 4, 2017 07:00 AM2017-07-04T07:00:34+5:302017-07-04T07:00:34+5:30
निवडणूक होऊन महिना उलटला आहे. मात्र, तरीही पनवेलचा महापौर निश्चित करण्यात आलेला नाही. यासंदर्भात अनेक चर्चांना उधाण
लोकमत न्यूज नेटवर्क
पनवेल : निवडणूक होऊन महिना उलटला आहे. मात्र, तरीही पनवेलचा महापौर निश्चित करण्यात आलेला नाही. यासंदर्भात अनेक चर्चांना उधाण आले असून, महापौरांबाबत पनवेलकरांची प्रतीक्षा अखेर संपली आहे. येत्या १० जुलैला महापालिकेची पहिली विशेष महासभा घेऊन महापौर, उपमहापौर यांची निवड होणार आहे.
पनवेल महापालिकेची स्थापना झाल्यानंतर सहा महिन्यांनंतर म्हणजेच २६ मे रोजी महापालिकेची निवडणूक झाली. या निवडणुकीत भाजपाने बाजी मारली. ७८पैकी भाजपाने बहुमताचा ५१ नगरसेवकांचा आकडा गाठला. शेकाप-२३, काँॅग्रेस-२, राष्ट्रवादी-२ तर शिवसेनेला आपले खाते उघडताही आले नाही. निवडणुकीनंतर गटनेता निवडीत राजकीय परंपरा पाहायला मिळाली. भाजपाच्या गटनेतेपदी परेश ठाकूर यांची वर्णी लावण्यात आली. महाआघाडीतही माजी नगराध्यक्ष जे. एम. म्हात्रे यांचे पुत्र प्रीतम म्हात्रे यांना गटनेतेपद देऊन राजकीय वारसा पुढे चालू ठेवला. महापौरपद अनुसूचित जमातीसाठी राखीव आहे.
महापौर, उपमहापौरांना बसण्यासाठी दालने नसल्यामुळे महापौरपदाची निवडणूक घेण्यात आली नाही. अखेर महापौरपदाच्या निवडीसाठी १० जुलै ही तारीख निश्चित केली आहे. महापालिकेच्या फडके नाट्यगृहात पहिली विशेष महासभा होणार असून, रायगडचे जिल्हाधिकारी पीठासन अधिकारी म्हणून काम पाहणार आहेत. सभेत महापौर, उपमहापौर, स्वीकृत सदस्य यांच्या निवडीबाबत निर्णय घेण्यात येणार आहेत.
नवनियुक्त नगरसेवकांना या महासभेविषयी पत्र पाठवून कळविण्यात आले असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. नवनियुक्त नगरसेवकांना सभाशास्त्र, सभेचे नियम, नगरसेवकांचे अधिकार याची माहिती देण्यासाठी सोमवारी फडके नाट्यगृहात प्रशिक्षण वर्गाचे आयोजन केले होते. या प्रशिक्षणात महासभेचे निमंत्रण देण्यात आल्याचे नगरसेवक समीर ठाकूर यांनी सांगितले. त्यामुळे आठ दिवसांनी पनवेलचा पहिला महापौर ठरलेला असेल, हे निश्चित झाले आहे.