महापौरपदावर आज शिक्कामोर्तब, नगरसेवकांना व्हिप, उपमहापौरपदावरून काँगे्रसमध्ये मतभेद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 9, 2017 01:45 AM2017-11-09T01:45:30+5:302017-11-09T01:45:41+5:30
महापौर व उपमहापौर पदासाठी ९ नोव्हेंबरला मतदान होणार आहे. शिवसेनेचे विजय चौगुले यांनी अर्ज न भरल्यामुळे निवडणुकीमधील रस्सीखेच थांबली आहे.
नवी मुंबई : महापौर व उपमहापौर पदासाठी ९ नोव्हेंबरला मतदान होणार आहे. शिवसेनेचे विजय चौगुले यांनी अर्ज न भरल्यामुळे निवडणुकीमधील रस्सीखेच थांबली आहे. प्रत्यक्ष मतदानादिवशी मते फुटू नयेत यासाठी सर्वपक्षीयांनी नगरसेवकांना व्हिप जारी केले आहेत. काँग्रेसमध्ये उपमहापौर पदावरून मतभेद सुरू असून नक्की कोण माघार घेणार की बंडखोरी कायम राहणार हे प्रत्यक्ष मतदानाच्यावेळीच स्पष्ट होणार आहे.
राष्ट्रवादीकडून महापौरपद हिसकावून घेण्यासाठी शिवसेनेने अनेक महिन्यांपासून प्रयत्न सुरू केले होते. परंतु ऐनवेळी भाजपाने तटस्थ राहण्याची भूमिका घेतल्याने विजय चौगुले यांनी माघार घेतली व निवडणुकीमधील चुरस जवळपास संपुष्टात आली. मतांसाठीचा घोडेबाजारही थांबल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. तरीही सुरक्षितता म्हणून अनेक नगरसेवकांना अज्ञात स्थळी हलविण्यात आले आहे. गुरुवारी दुपारी तीन वाजता महापौर व उपमहापौरपदासाठी मतदान होणार आहे. हात वर करून मतदान करावे लागणार असल्याने मतांचे विभाजन होण्याची शक्यता धूसर झाली आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेनेने त्यांच्या नगरसेवकांना व्हिप जारी केले असून पक्षाच्या विरोधात भूमिका घेतल्यास कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.
उपमहापौरपदासाठी काँगे्रसमधील मतभेद कायम आहेत. पक्षाने मंदाकिनी म्हात्रे यांना अधिकृत उमेदवारी दिली आहे. जिल्हा अध्यक्ष दशरथ भगत यांच्या पत्नी वैजयंती भगत यांनी बंडखोरी करून अर्ज दाखल केला आहे. अर्ज कोण मागे घेणार याविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे. पक्षाने दिलेला व्हिप दहापैकी सात नगरसेवकांनी स्वीकारला असून भगत यांच्या कुटुंबातील तीन नगरसेविकांनी व्हिप घेतला नव्हता. बुधवारी रात्री पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी दशरथ भगत यांना चर्चेसाठी बोलावले होते. उशिरापर्यंत अर्ज मागे घेतला जाणार का याविषयी काहीही अधिकृत माहिती पक्षाच्यावतीने देण्यात आली नाही.