महापौरांचा सुरक्षारक्षक अभ्यास दौऱ्यात?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2018 11:18 PM2018-10-21T23:18:39+5:302018-10-21T23:18:53+5:30
पनवेल महानगर पालिकेचे नगरसेवक रविवारी सिक्कीमच्या अभ्यास दौ-यावर रवाना झाले आहेत.
- वैभव गायकर
पनवेल : पनवेल महानगर पालिकेचे नगरसेवक रविवारी सिक्कीमच्या अभ्यास दौ-यावर रवाना झाले आहेत. यात पनवेलच्या महापौर डॉ. कविता चौतमोल यांचा सुरक्षा रक्षकही सहभागी झाल्याने या सुरक्षा रक्षकाचा खर्च कोणी केला, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
या अभ्यास दौºयासाठी पनवेल महानगर पालिकेच्या महापौर डॉ. कविता चौतमोल यांचा सुरक्षा रक्षक म्हणून कार्यरत असलेल्या भाऊसाहेब पाटील देखील रवाना झाला असून नगरसेवकांसोबत महापौरांचा फोटो सध्या व्हायरल झाला आहे.
एकीकडे पनवेल क्षेत्रात गंभीर पाणीसमस्या निर्माण झाली आहे. दोन दिवसांपूर्वी पार पडलेल्या महासभेत त्याचे पडसाद पाहावयास मिळाले. या गंभीर समस्येवर तोडगा काढण्याऐवजी नगरसेवक अभ्यास दौºयाच्या नावाखाली पिकनिकला गेले आहेत. या नगरसेवकांच्या ताफ्यात महापौरांचा सुरक्षा रक्षक भाऊसाहेब पाटील हा देखील असल्याचे व्हायरल झालेल्या छायाचित्रावरून स्पष्ट झाले आहे. विशेष म्हणजे अशाप्रकारच्या अभ्यास दौºयात सुरक्षा रक्षकांना स्थान दिले जाते का? त्याचा खर्च कोणी उचलला यावरून सध्या पालिका वर्तुळात तर्कवितर्क लावले जात आहेत.
महापौरांचे सुरक्षा रक्षक या अभ्यास दौºयात सहभागी झाल्याबाबत माहिती नसल्याचे महापालिकेचे प्रभारी नगरसचिव तिळकराज खापर्डे यांनी सांगितले. मात्र स्वखर्चाने कोणीही या अभ्यास दौºयासाठी जावू शकतो, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
>पनवेल महानगर पालिकेचे शेकापचे नगरसेवक अरविंद म्हात्रे हे देखील या दौºयावर गेले आहेत. रविवारी त्यांचा वाढदिवस असल्याने भाजपा, शेकापच्या सर्व नगरसेवकांनी गंगटोक याठिकाणी त्यांचा वाढदिवस एकत्रित साजरा केला.