गांजा विक्रेत्यांचा मोर्चा एमआयडीसीकडे

By admin | Published: September 17, 2016 02:26 AM2016-09-17T02:26:59+5:302016-09-17T02:26:59+5:30

अमली पदार्थ विरोधी पथकाच्या धडक मोहिमांनंतर शहरातील गांजामाफियांचे धाबे दणाणले आहे. जूनपासून २१ जणांना गजाआड केल्यानंतर अनेकांनी व्यवसाय बंद केले

MDC to the Ganja Mantra Morcha | गांजा विक्रेत्यांचा मोर्चा एमआयडीसीकडे

गांजा विक्रेत्यांचा मोर्चा एमआयडीसीकडे

Next

नामदेव मोरे , नवी मुंबई
अमली पदार्थ विरोधी पथकाच्या धडक मोहिमांनंतर शहरातील गांजामाफियांचे धाबे दणाणले आहे. जूनपासून २१ जणांना गजाआड केल्यानंतर अनेकांनी व्यवसाय बंद केले आहेत. काही सराईत विक्रेत्यांनी एमआयडीसीत आश्रय घेतला आहे. बोनसरीसह तुर्भे स्टोअर्सला खुलेआम विक्री सुरू असून, स्थानिक पोलिसांचे त्याकडे दुर्लक्ष होत आहे.
शहरातील तरुणाईला अमली पदार्थांच्या जाळ्यात अडकविणाऱ्या मृत्यूच्या सौदागरांविरोधात ‘लोकमत’ने आवाज उठविल्यानंतर अमली पदार्थ विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनोद चव्हाण यांनी कारवाईचा धडाका सुरू केला. जूनमध्ये या विभागाची धुरा त्यांच्याकडे आल्यानंतर शहरात २० वर्षांतील विक्रमी कारवाई करून दाखविली आहे. परंतु स्थानिक पोलीस स्टेशनमध्ये अधिकारी व कर्मचारी अवैध व्यवसायांविरोधात ठोस कारवाई करत नसल्यामुळे अमली पदार्थमुक्त नवी मुंबई मोहिमेला खीळ बसत आहे. शहरातील टारझन, अशोक पांडेसह पनवेलच्या राणीला गजाआड केल्यानंतर अनेक गांजामाफियांचे धाबे दणाणले आहे.
नागरी वस्तीतील बहुतांश सर्व अड्डे बंद झाले आहेत. परंतु अमली पदार्थांना असलेली मागणी व प्रचंड आर्थिक उलाढाल यामुळे अनेक गुंडांचा हा पूर्ण वेळ व्यवसाय झाला आहे. त्यांनी आता एमआयडीसीमध्ये बस्तान बसविण्यास सुरवात केली आहे. एक महिन्यापूर्वी ‘लोकमत’च्या स्टिंग आॅपरेशनमध्ये एपीएमसीमध्ये आढळलेला इकबाल तुंडा आता बोनसरी गावच्या प्रवेशद्वारावर गांजा विकत आहे. पोलिसांच्या कारवाईची भीती असल्यामुळे जवळ जास्त साठा ठेवत नाही. रोडवर उभा राहून नेहमीच्या ग्राहकांनाच त्याची विक्री करत आहे. कोणी ओळखीच्या व्यक्तीने पाहिलेच तर आता मी गांजा विक्री बंद केली आहे. कधीतरी घर चालविण्यासाठी दोन चार पुड्या विकत असल्याचे तो सांगतो.
एपीएमसी, नेरूळ, सीबीडी, तळोजामधील अनेक गांजा अड्ड्यांवर धाड पडली आहे. यामुळे आता तुर्भे स्टोअर्सच्या लालबत्ती परिसर, बोनसरी गाव व एमआयडीसीतील इतर गांजा विक्रेत्यांचा भाव वधारला आहे. पूर्वी ८० ते १०० रुपयांना विकली जाणारी पुडी आता १२० रुपयांना विकली जात आहे. गांजा विक्रीतील धोका वाढला आहे. तुम्ही नियमित ग्राहक असल्यामुळे तुमच्यासाठी रिस्क घेत असल्याचे सांगून जादा पैसे वसूल केले जात आहेत. अ‍ॅक्टिव्हावरून एक जण एमआयडीसीतील गांजा विके्रत्यांना रोज सकाळी गांजा पुरवठा करतो. मागणी असेल त्याप्रमाणे पुरवठा सुरू आहे.
बोनसरीमधील अनेक नागरिकांना अ‍ॅक्टिव्हाचा नंबरही पाठ झाला आहे. गांजा विक्री कुठे सुरू आहे व कोण करते याची सर्व माहिती नागरिकांना आहे. मग स्थानिक पोलिसांना त्याची माहिती कशी नाही असा प्रश्न उपस्थित होत आहे. पोलीस दुर्लक्ष करत असल्यामुळेच अवैध व्यवसाय सुरू असल्याचेही नागरिक खुलेआम बोलू लागले आहेत.

Web Title: MDC to the Ganja Mantra Morcha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.